सहकार मंत्री सुभाष शिरोडकराचा विश्वास : संचालक मंडळाशी चर्चा, गोवा डेअरी दुध पॅकींग युनिटला भेट
प्रतिनिधी /फोंडा
गोवा डेअरीच्या दुधाबाबत ग्राहकामध्ये असलेली विश्वासहर्ता आजही अबाधित आहे. येणाऱया चतुर्थी व दिवाळी सणापुर्वी राज्यातील दुध संकलनात वाढ तसेच गरज पडल्यास परराज्यातून दुध मागवून वाढत्या दुधाची मागणी पुरविली जाईल. येत्या वर्षाभरात गोवा डेअरी संलग्न शेतकऱयाकडून सुमारे 1 लाख लिटर दुध संकलन करण्याचे उद्दिष्टय़ पार करेल असा ठाम विश्वास सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केला.
गोवा राज्य सहकारी दुध उप्तादक संघ म्हणजेच गोवा डेअरी सहकारी मंत्री सुभाष शिरोडकर यानी काल सोमवारी भेट दिली. नवनिर्वाचित संचालक मंडळाकडे महत्वाची बैठक घेतली. त्यानंतर दुध पॅकिंग युनिटला भेट घेऊन आढावा घेतला. गोव्यातील शेतकऱयामध्ये उदासीन धोरण असून ती मरगळ दूर करण्यासाठी 11 तालुक्यातील शेतकऱयाशी बैठक घेण्यात येईल. लाटंबार्से डिचोली येथील सुमुल दुध प्रकल्पापासून गोवा डेअरीला कोणताच धोका नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच भक्कम पाठिंबा गोवा डेअरीला कायम राहिलेले आहे. येत्या दिवसात पशुसंवर्धन खात्याच्या सहकार्याने शेतकऱयांसाठी असलेल्या योजना सुटसुटीत करून दुध संकलन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. सद्यपरिस्थीत मारवासडा उसगांव येथील पशुखाद्य प्रकल्पालही पुर्ण क्षमतेसह चालविण्यासाठी आग्रही असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बोलताना गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी सरकारच्या सहकार्याने संचालक मंडळ गोवा डेअरीला उभारी देणार असल्याचे सांगितले. गोवा डेअरीची घसरलेली दुधविक्री वाढविण्याबरोबर ग्राहकांना हाय फॅट दूध उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकऱयांना भेडसावणाऱया चिंता व सुविधा पुरविण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नरत राहणार असल्याचे फळदेसाई म्हणाले.