गोवा डेअरीच्या आमसभेला लागलेय ग्रहण : महिन्याभरात आमसभा घेण्याची दुध उत्पादकांची मागणी
प्रतिनिधी /फोंडा
गोवा राज्य सहकारी दुध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीची चर्चित आमसभा कोणत्याच ठोस चर्चेविना दुध उत्पादक एमडीची बेकायदेशीररित्या नियुक्तीच्या कारणावरून गदारोळ घातल्याने आमसभा रद्द करण्यात आली. गोवा डेअरीत प्रशासकीय समितीचे ओएसडी म्हणून कार्यरत असलेले काशी नाईक यांची नियुक्ती बेकायदेशीररित्या झाल्याचा टपका दुध उत्पादकांनी ठेवला. एमडी या नात्याने आमसभेच्या नोटीशी त्यांनी कशा पाठविल्या हे एकमेव कारण ठेवत आमसभा रद्द करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय समितीचे अध्यक्ष आगुस्तिनो मिश्किता यांनी दिली.
कुर्टी येथील सहकार भवनात काल बुधवारी पशुसंवर्धन खात्याचे संचालक आगुस्तिनो मिश्किता यांच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा सुरू करण्यात आली होती. केवळ दोन तासात आमसभा रद्द करण्यात आली. कायदेशीरित्या कायमस्वरूपी एमडीची नियुक्त डेअरीवर करण्यात यावी. त्यानंतर महिनाभराच्या अवधीत आमसभा बोलविण्यात यावी अशी मागणी दुध उत्पादकांनी केलेली आहे. कथित भ्रष्टाचारप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या संचालक मंडळाचे न्यायालयीन निवाडा झाल्यानंतरच गोवा डेअरीची निवडणूक प्रक्रिया करण्यात यावी असे काही दुध उत्पादकांनी पर्याय सुचविलेला आहे. मागील आमसभा ऑडीटरच्या नेमणूकीच्या प्रश्नावरून तहकूब, लांबवणीवर अशी प्रक्रिया सुरू असताना सहकार निबंधकांनी ती गाहय़ कशी धरण्यात आली. ऑडीटला आमसभेत मान्यता न मिळताच दुसऱया आर्थिक वर्षाची आमसभा कशी घेतली असा प्रश्नही दुध उत्पादकांनी उपस्थित केला.
याप्रकरणी मिश्किता यांनी आमसभा कोणतीच चर्चा व ठराव मान्य न करता रद्द करण्यात आल्याची माहिती दिली असून कायमस्वरूपी एमडीच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया करण्यासाठी सहकार निबंधकांना कळविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रशासकीय समितीचे यतीश कामत, अवित नाईक,ओएसडी काशी नाईक उपस्थित होते.
मागील वर्षाभरापासून आमसभा गदारोळ माजवून रद्द, तहकूब, लांबवणीवर टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. गोवा डेअरीच्या आमसभेला लागलेले ग्रहण कधी सुटणार याकडे दुध उत्पादकांची नजर लागून राहिलेली आहे.