येत्या सोमवारपासून दोन महिने चालणार मोहीम
प्रतिनिधी / पणजी
राज्यात सेनजी गॅस वापरास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गोवा नॅचरल गॅस या कंपनीतर्फे ’गोवा ड्राईव्हस् ग्रीन’ या मोहीमेची घोषणा केली आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद खान यांनी ही माहिती दिली. घरगुती किंवा वाहनांसाठी वापरण्यात येणाऱया अन्य गॅसच्या तुलनेत सीएनजी हा सर्वाधिक सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही गॅस असून वापरकर्त्यांना सर्वदृष्टय़ा किफायतशीर असल्याचे ते म्हणाले.
कंपनीतर्फे घरगुती वापरासाठी पाईपलाईन च्या माध्यमातून गॅस पुरवठा करण्यात येत असून एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुलनेत तो 15 टक्के कमी किंमतीत उपलब्ध होतो. त्यामुळे त्याला मोठा प्रतिसाद मिळत असून राज्यात आतापर्यंत 10 हजारांपेक्षा जास्त घरगुती ग्राहक जोडले गेले आहेत. त्याशिवाय मडकई, कुंडई, उसगाव, डिचोली आदी औद्योगिक वसाहतींमधील 18 पेक्षा जास्त कंपन्या तसेच अन्य अनेक व्यावसायिक आस्थापनांनीही हा गॅस वापरण्यास प्रारंभ केला आहे.
या क्षेत्रात आणखी एक पाऊल मारताना वाहनांसाठी इंधन पुरवठा करण्याच्या उद्देशाने 6 सीएनजी स्टेशन्स कार्यरत असून लवकरच आणखी 4 स्टेशन्स् सुरू करण्स्त येणार आहेत, यातील 2 स्टेशन सुरू होण्याच्या मार्गावर आहेत, असे खान यांनी सांगितले.
दरम्यान, ’गोवा ड्राईव्हस् ग्रीन’ मोहिमेबद्दल अधिक माहिती देताना ही मोहीम 24 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या काळात राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्यानुसार जे ग्राहक नवीन सीएनजी वाहन खरेदी करतील किंवा विद्यमान कार सीएनजीमध्ये परावर्तीत करतील त्या प्रत्येकाला कारचा मेक आणि मॉडेलनुसार प्रत्येकी 2500 ते 10,000 पर्यंतचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. त्यासाठी वाहनाचे आरटीओ नोंदणी प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असे खान यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस श्री. वकील, डीजीएम मोहम्मद सफर, वरिष्ठ व्यवस्थापक अमित गोखले आदींची उपस्थिती होती.