Tarun Bharat

गोवा बनतेय ‘सेक्स ट्रेड’चे प्रमुख ठिकाण

केंद्र सरकारच्या अहवालातून उघड ; अन्य राज्यांतील मुली, महिलांचा वापर धक्कादायक अहवालामुळे राज्यात खळबळ

प्रतिनिधी /पणजी

गोवा हे राज्य महिला-मुले यांच्या लैंगिक व्यापारासाठीचे (सेक्स ट्रेड) प्रमुख ठिकाण असल्याचा अहवाल मुंबईतील संस्थेने केंद्र सरकारला सादर केला असून केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने तो प्रकाशित केला आहे. पर्यटनाच्या नावाखाली महिला-मुलींची बेकायदा वाहतूक गोव्यातून होत असून देशातील इतर राज्यातूनच नव्हे तर नेपाल, बांगलादेश या भारताशेजारील देशातूनही गोवामार्गे त्यांची वाहतूक चालू असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 केंद्र सरकारतर्फे हा अहवाल प्रकाशित करण्यात आल्यामुळे तो गोव्यासाठी धक्कादायक ठरला असून खळबळ माजली आहे.

 पर्यटनाच्या गेंडस नावाखाली अपकृत्य

देशाच्या इतर राज्यातून विविध वयातील महिला-मुलींची गोवा राज्यातून वाहतूक होत असून त्यात लहान मुलांचाही समावेश असल्याचे अहवालात म्हटले आहे. सदर अहवाल अनेक पानांचा असून काही पुरावे सापडल्याचा आणि त्या आधाराने हा अहवाल तयार झाल्याचा दावा त्यातून करण्यात आला आहे. पर्यटनाच्या गोंडस नावाखाली हे सर्व काही चालत असल्याचे त्यात म्हटले आहे.

अंमलीपदार्थांच्या वाढत्या व्यवहाराने चिंता

गोव्यात गेल्या काही वर्षापासून अंमलीपदार्थांचा साठा मोठय़ाप्रमाणात सापडत असून त्यांचे सेवनही अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. या व्यवहारात विदेशी, देशी लोकांबरोबरच गोमंतकीयांचाही सहभाग वाढत असल्याचेही आकडेवारीवरुन उघड झाले आहे.

अनेकवेळा झालाय ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश

गोव्यात ‘सेक्स रॅकेट’ चा पर्दाफाश अधूनमधून होताना दिसतो. देशांतील अनेक राज्यांतून तरूणींना वेश्या व्यवसायासाठी गोव्यात आणण्यात येत असल्याचे प्रकार वाढत असून ते उघडकीस येताना दिसतात. अहवालातील जो निष्कर्ष काढण्यात आला आहे त्याचा संबंध या प्रकारांशी असण्याची शक्यता आहे. गोवा राज्याबाहेरून इतर राज्यातून मुलींना, तरूणींना लैगिक व्यापाऱयासाठी गोव्यात आणले गेल्याचे अनेक प्रकार पोलिसांनी यापूर्वी उघडे पाडले आहेत.

गोव्याचे नाव बदनाम होण्याची शक्यता

या प्रकरणातील पीडीत मुली-महिला यांना मेरशी येथील ‘अपना घर’मध्ये पाठवले जाते. परंतु नंतर पुढे त्यांचे काय होते याचा पत्ता कोणालाच लागत नाही. अलिकडे तर म्हापसा येथे अल्पवयीन मुलांचे लैगिक शोषण झाल्याचा प्रकारही घडला होता. सध्या प्रकाशित झालेल्या या ताज्या अहवालामुळे गोव्याचे नाव बदनाम होण्याचा धोका दिसून येत आहे.

सरकारी, खासगी संस्थांनी तयार केला अहवाल

सरकारी व स्वयंसेवी संस्था (एनजीओ) यांनी केलेल्या अभ्यासाचा आधार घेऊन केंद्र सरकारने हा अहवाल जारी केला आहे. महिलांची लैंगिक व्यापारासाठी वाहतूक हा अभ्यासाचा विषय होता. राष्ट्रीय स्तरावर हा अभ्यास करण्यात आला असून त्यानुसार निष्कर्ष काढण्यात आले आहेत. लैंगिक व्यापारासाठी म्हणजेच वेश्याव्यवसायाकरीता महिलांची वाहतूक होते आणि त्याच्याशी गोवा हे राज्य संलग्न आहे.

नेपाळ, बांगलादेशमधूनही आणतात महिलांना

ओडिशा, नागालँड, बंगाल व इतर इशान्येकडील राज्यांतून गोव्यात महिलांची वाहतूक होते तशीच ती नेपाळ – बांगलादेशमधूनही होत असल्याचे अहवालात नमूद आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स – बीएसएफ) अधिकाऱयांना लाच देऊन आंतरराष्ट्रीय भारतीय सीमेवरुन देशात तरुणींची वाहतूक होते. भारत-नेपाळ सीमापार करण्यासाठी करार असल्याने त्याचा लाभ घेऊन महिलांची वाहतूक भारताकडे व नंतर गोव्याच्या दिशेने होत असल्याचे अहवालातून स्पष्ट केले आहे.

पर्यटनाच्या नावाखाली चालतो वेश्याव्यवसाय

नेपाळमधून भारतात प्रवेश करण्यासाठी फारशी कागदपत्रे लागत नसल्याने प्रवेश सोपा झाला असून देशात लैंगिक व्यापाऱयांसाठी येणाऱया तरुणींची नोंद होत नाही असे अहवालात म्हटले आहे. गोवा हे राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्यामुळे गोव्यात मोठय़ा प्रमाणात देशी-विदेशी पर्यटक येतात म्हणून वेश्या व्यवसायाला तेजी आली आहे. त्याचाच परिणाम म्हणून गोवा हे महिला व्यापारासाठी प्रमुख ठिकाण झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.

Related Stories

गोवा षष्ठय़ब्ध्दी सोहळ्य़ास राष्ट्रपतींची खास उपस्थिती

Patil_p

फोंडय़ात पन्नास कार्यकर्त्यांचा मगो प्रवेश

Patil_p

प्रदेश भाजपकडून पंतप्रधानांचे अभिनंदन

Patil_p

थकीत पाणी बिलांसाठी एकरकमी योजना

Amit Kulkarni

राजीव कला मंदिरात सुरश्री केसरबाई केरकर संगीत महोत्सवाला थाटात प्रारंभ

Amit Kulkarni

चिपळे, काळशीतील मतदारांचे मनपरिवर्तन करण्यात यश

Amit Kulkarni