मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : 118 नवउद्योजकांचे केले अभिनंदन
प्रतिनिधी /पणजी
केवळ अपवाद वगळता प्रत्येक गावात कोणत्या ना कोणत्या बँकेची शाखा असणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य असून प्रत्येक नागरिकाचे किमान एक तरी खाते या बँकांमध्ये हमखास आहे. त्याद्वारे सरकारी अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पणजीत मिनेझीस ब्रागांझा सभागृहात आयोजित क्रेडिट आऊटरिच कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर श्रीमती स्मिता कुमार, नाबार्डचे सरव्यवस्थापक नवीन कुमार गुप्ता आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
118 जणांचे उद्योजक बनण्याचे स्वप्न पूण
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी विविध बँकांकडून मिळालेल्या कर्जामुळे उद्योजक बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकलेल्या 118 उद्योजकांचे अभिनंदन केले. त्यात महिलांचाही भरणा असून वैशिष्ठय़पूर्ण बाब म्हणजे एका दिव्यांगानेही स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे, असे सांगून एखादी व्यक्ती दिव्यांग असली म्हणजे तिच्यात कौशल्यगूण नसतात असा प्रकार नसतो. त्यासाठी मनाची जिद्ध महत्वाची असते. चाकोरीबाहेरील काहीतरी करून दाखविण्याची धमक, तळमळ असावी लागते. अशी जिद्ध दाखविणारे कर्तृत्ववान ठरतात आणि ते सदैव इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.
ग्रामीण भागातील अनेक स्वयंसेवी गटांनीही आपल्या विद्यमान व्यवसाय वाढीसाठी कर्ज घेतले आहे. त्यांचेही अभिनंदन करत असल्याचे सांगून त्या कर्जनिधीचा योग्य वापर करावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.