प्रतिनिधी / पणजी
गोवा मद्यार्क विक्रेता संघटनेने मंगलदास नाईक यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि व्हॅट प्रकरणी त्यांच्यावर लादण्यात आलेले प्रचंड कर कमी करावे, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन आज शुक्रवारी या प्रकरणी तोडगा काढण्याचे आदेश आपल्या अधिकाऱयांना दिले.
गोवा मद्यार्क विक्री संघटनेचे निमंत्रक मंगलदास नाईक यांच्याबरोबर गेलेल्या शिष्टमंडळात सगुण शिरोडकर, जितेंद्र सावंत यांचा समावेश होता. 2018-19 या आर्थिक वर्षापासून व्हॅट करप्रणाली अंतर्गत नियमित करांपेक्षाही जास्त पटीने कर लागू केले. करांचा बोजाच एवढा प्रचंड प्रमाणात टाकला की दुकाने विकली व आतील माल विकला तरी हे कर भरणे शक्य होणार नाही. आम्ही नियमित कर भरणारी सर्व मंडळी असून आमच्यावर लादलेला कर हा अन्यायकारक आहे. या अन्यायकारक करांमुळे सर्वांचा व्यवसाय पूर्णपणे बुडणार. या व्यवसायातून सरकारला दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचा अबकारी करही मिळत आहे.
मुख्यमंत्र्यीं शिष्टमंडळाने लेखी दिलेल्या निवेदनाची दखल घेतली व यातून सुवर्णमध्ये काढू असे आश्वासन दिले व अधिकारी अजित रॉय यांना बोलावून आज शुक्रवारी मंत्रालयात बैठक घेऊन या विषयावर तोडगा काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी 10 वाजता पर्वरीत मंत्रालयात बैठक घेतली जाईल. या वेळी जीएसटी अधिकारी व इतर अधिकारीही उपस्थित राहतील. अबकार अधिकारीही बैठकीत सहभागी होतील.