प्रतिनिधी /पणजी
दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर विन्सन वर्ल्डतर्फे 13वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव दि. 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत चित्रपटांची मेजवानी घेऊन येत आहे. सुरूवातीच्या काळापासून हा महोत्सव केवळ प्रेक्षकांमध्येच नाही तर चित्रपट कलाकारांमध्येही फार लोकप्रिय झालेला असल्याची माहिती उदय म्हांबरो यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी विन्सन वर्ल्डचे अध्यक्ष संजय शेटय़े, संचालक श्रीपाद शेटय़े, सिद्धेश म्हांबरे, आयएफबी मॉडय़ुलर किचनच्या श्रद्धा पाटील, समीक्षक सचिन चाटे उपस्थित होते.
यावर्षी मराठी चित्रपटसृष्टीला संपूर्ण जीवन व्यतित केलेले प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना प्रतिष्ठित कृतज्ञता पुरस्कार गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते देण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळा दि. 5 रोजी सायं. 5.30 वा. आयनॉक्स येथे होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन उपस्थित राहणार आहे. याशिवाय महोत्सवात अभिनेते आणि दिग्दर्शकांसह मराठी चित्रपटसृष्टीतील प्रमुख कलाकार सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, नेहा पेंडसे, सई ताम्हणकर, अमेय वाघ, किशोर कदम, मृण्मयी गोडबोले, संजय जाधव, सुहरूद गोडबोले, सचिन कुंडलकर, आदित्य सरपोतदार, अनंत महादेवन, प्रसाद ओक, गजेंद्र अहिरे असे अनेक कलाकार उपस्थित राहतील अशी माहिती उदय म्हांबरो यांनी दिली.
यावर्षी गोवा मराठी चित्रपट महोत्सवात 20 हून जास्त चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार असून यात संजय जाधव यांचा तमाशा लाईव्ह, मृणाल कुलकर्णी यांचा सहेला रे, क्रिप्टो आजी, सुहरूद गोडबोले यांचा जून, सचिन कुंडलकर यांचा पाँडिचेरा, निपुण धर्माधिकारी यांचा मी वसंतराव, प्रसाद ओक यांचा चंद्रमुखी, आदित्य सरपोतदार यांचा झोंबिवली, अक्षय इंडीकरचा स्थलपुराण, मंगेश जोशीचा कारखानीसांची वारी, अनंत महादेवन यांचा कडू गोड, शंकर धोत्रे यांचा पोत्रा, निखिल महाजन यांचा गोदावरी, ओंकार बर्वेचा धीड, रसिका आगाशेचा तिचं शहर होणं, विश्वास जोशीचा फुलराणी, प्रताप फड यांचा अनया, रवी जाधव यांचा टाईमपास 3, गजेंद्र अहिरे यांचा गोदाकाठ, पैठणी या चित्रपटांचा समावेश आहे. सदर चित्रपट आयनॉक्स व मॅकेनिज पॅलेस येथे दाखविण्यात येतील अशी माहिती समीक्षक सचिन चाटे यांनी यावेळी दिली.
या महोत्सवाचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. तसेच या महोत्सवात नोंदणीशुल्क 700 रूपये आकारले जाणार आहेत. तसेच बुक माय शोवर महोत्सवासाठी प्रेक्षक बुकिंग करू शकतात अशी माहिती विन्सन वर्ल्डचे संजय शेटय़े यांनी दिली.