प्रतिनिधी /पणजी
गोवा प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश युवा अध्यक्षांसह राज्यातील सर्व युवा समित्या बरखास्त करण्यात आल्या असून 6 सप्टेंबरपासून नवीन सदस्य नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती गोवा प्रदेश सदस्य नोंदणी प्रमुख रिया भार्गव यांनी दिली. पणजीतील गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सभागृहात नवीन युवा काँग्रेस सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.
नवीन युवा सदस्यांना काँग्रेसमध्ये स्थान देण्यासाठी या समित्या बरखास्त करण्यात आल्या तेथे आता नव्या दमाच्या तडफदार युवक युवतीना स्थान देण्याचा पक्षाचा मानस आहे असे त्यावेळी सांगण्यात आले. ऑनलाईन, डिजिटल व इतर सर्व माध्यमातून नवीन सदस्य नोंदणी करण्यात येणार असून निवडणूक अर्ज प्रक्रीया 6 ते 12 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे तर नोंदणी अर्ज 21 सप्टेंबर ते 31 ऑगस्टोबर या कालावधीत स्विकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर व इतर पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते तर मावळते युवा काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर आणि इतर पदाधिकाऱयांनी हजेरी लावली होती. काँग्रेस पक्षात नव्या – ताज्या दमाच्या युवकांनी सामिल होवून पक्ष बळकट करावा असे आवाहन त्यावेळी करण्यात आले.