पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा : व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केले मार्गदर्शन : गोव्यासह देशासाठी योगदानाचे आवाहन
पंतप्रधान म्हणाले…
- भाजपच्या ‘डबल इंजिन’ सरकारची गोव्याला मदत
- मोपा विमानतळासाठी केंद्राकडून तिनशे कोटी
- अन्य प्रकल्पांसाठी हजारो कोटींचे अर्थसहाय प्रदान
- शेतकऱ्यांसाठी केंद्र, राज्याकडून अनेक योजना
प्रतिनिधी / पणजी
भाजपच्या डबल इंजिन सरकारने गोव्यासह अनेक राज्यांत रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले असून केंद्राने मोपा विमानतळासाठी ऊ. 300 कोटी दिले आहेत. त्या शिवाय गोव्यात इतर साधनसुविधा आणि जोडणी प्रकल्पांसाठी हजारो कोटीचे अर्थसहाय्य प्रदान केले आहे. मोपाचे लवकरच लोकार्पण होणार असून स्वयंपूर्ण गोवा, पर्यटन धोरण, मोपासह इतर सर्व प्रकल्पातून गोव्यातील युवकांना हजारो रोजगार मिळतील आणि सर्वांगीण विकास होईल, अशी खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
काल गुऊवारी दोनापावला राजभवन येथील दरबार हॉलमध्ये राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यास व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना पंतप्रधान बोलत होते.
तब्बल 1250 जणांना नियुक्तीपत्रे
या रोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सुमारे 1250 जणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे देण्यात आली.
गोव्यासह देशासाठी योगदान द्यावे
भारतीय स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करण्यासाठी नवनिर्माण भारताचे स्वप्न व ध्येय ठरवण्यात आले असून ते 2047 मध्ये साध्य व्हावे म्हणून गोमंतकातील जनतेने गोव्यासह देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन मोदी यांनी केले.
आगामी काळातही होणार नोकरभरती
नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करून ते पुढे म्हणाले की, आगामी काळात गोव्यातील पोलीस व इतर सरकारी खात्यातही नोकरभरती होणार असून त्यामुळे पोलीस दल मजबूत होईल. शिवाय गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची व गोव्यातील जनतेची सुरक्षा अधिक बळकट करता येईल, असे मोदी म्हणाले.
नवनिर्माण भारतसाठी काम करा
स्वयंपूर्ण गोवा मोहीम यशस्वी झाल्याचे सांगून मोदी यांनी मोपा विमानतळाबाबत सरकारचे कौतुक केले. त्याच मोहिमेतून मोठ्या प्रमाणात गोव्यात रोजगार संधी प्राप्त झाली असून पर्यटनाचा मास्टर प्लॅन (आराखडा) कार्यान्वित केल्यानंतर रोजगारात वाढ होईल. गोव्यातील ग्रामीण भागातही रोजगार संधी उपलब्ध होतील, आणि तेथे विविध साधनसुविधांचे जाळे तयार होऊन त्याचा लाभ ग्रामीण जनतेला मिळेल.
शेतकऱ्यांसाठी केंद्र, राज्याकडून योजना
शेतकरी वर्गासाठी केंद्रासह गोव्याने देखील चांगल्या योजना आखल्या असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत असल्याचे मोदी यांनी नमूद केले. नोकऱ्यांची नियुक्तीपत्रे मिळालेल्या उमेदवारांनी देखील गोव्यासह देशाच्या विकासासाठी आणि प्रामुख्याने 2047 च्या नवनिर्माण भारताकरीता काम करावे, असे मोदी म्हणाले. शेवटी त्यांनी गोव्यातील जनतेला नोकरी मिळालेल्या उमेदवारांना, त्यांच्या पालकांना शुभेच्छा दिल्या.
या मेळाव्यास मंत्री सुभाष फळदेसाई, मंत्री बाबूश मोन्सेरात, मंत्री रवी नाईक, मंत्री सुभाष शिरोडकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ : मुख्यमंत्री
या रोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सुमारे 1250 जणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे देण्यात आली. त्यावेळी बोलताना डॉ. सावंत म्हणाले की, नवीन वर्ष 2023 जानेवारीपासून सरकारी नोकरभरती थेट कर्मचारी भरती आयोगामार्फत (स्टाफ सिलेक्शन कमिशन) करण्यात येणार आहे. सरकारी नोकरीसाठी किंवा कामांसाठी पैसे मागणाऱ्यांना अटक व कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला असून पोलीस स्थानकात त्यांच्या विरोधात तक्रारी नोंदवा असे डॉ. सावंत यांनी सांगितले. ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ या तत्वावर आपले सरकार कार्यरत असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला.
परत परत परीक्षा देण्याची गरज नाही
सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांना परत परत परीक्षा देण्याची गरज नाही तसेच मंत्री आमदारांकडे जाण्याची गरज नाही, असे निवेदन डॉ. सावंत यांनी रोजगार मेळाव्यातून केले.
मोपा विमानतळावर 1200 जणांना नोकरी
मोपा विमानतळावर 1200 जणांना नोकरीची नियुक्तीपत्रे मिळाली आहेत. मेगा जॉब फेअरमध्ये 1000 जणांना पत्रे देण्यात आली तर 1000 जणांना पुढील फेरीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. खासगी उद्योग कंपनीत ठराविक कालावधीसाठी नोकरी मिळावी म्हणून सरकार प्रयत्न करीत असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
अग्निशामक दल, पोलीस, कृषी, नदी परिवहन, नियोजन-सांख्यिकी अशा सरकारी खात्यातील विविध नोकऱ्यांसाठी 1250 जणांना राजभवनातील रोजगार मेळाव्यात पत्रे देण्यात आली.