Tarun Bharat

‘आयुष’ मुळे गोवा बनेल आयुर्वेद हब

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा विश्वास : उद्यापासून पणजीत जागतिक आयुर्वेद परिषद

प्रतिनिधी /पणजी

धारगळ येथे स्थापन करण्यात आलेल्या आयुष इस्पितळाच्या माध्यमातून गोव्याला आयुर्वेदाचे वेलनेस हब म्हणून विकसित करण्यात येईल. त्याचबरोबर ही संस्था शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी आदर्श केंद्र म्हणून काम करेल, अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली.

दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजापारा महेंद्रभाई, सचिव डॉ. राजेश कोटेचा यांच्यासह आयुष मंत्रालयाचे अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी लोकार्पण

येत्या रविवारी 11 डिसेंबर रोजी धारगळ अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गाझियाबाद येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ युनानी मेडिसिन आणि दिल्ली येथील राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था, या तीन राष्ट्रीय संस्थांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात येईल.

उद्यापासून जागतिक आयुर्वेद परिषद

दि. 8 ते 11 डिसेंबर दरम्यान पणजीत होणाऱया 9 व्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषदेच्या समारोप सोहळ्यावेळी पंतप्रधान या प्रकल्पांचे लोकार्पण करतील. आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी उपचार पद्धतींच्या या तीन राष्ट्रीय संस्थांच्या स्थापनेमुळे पदवी पूर्व (युजी), पदव्युत्तर (पीजी) आणि डॉक्टरेट अभ्यासक्रम करू इच्छिणाऱया 400 विद्यार्थ्यांसाठी जागा निर्माण होतील आणि या तिन्ही शाखांसाठी 550 अतिरिक्त खाटाही उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

परवडण्यायोग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध

धारगळ येथील आयुष इस्पितळ संस्था आयुर्वेद चिकित्सा पद्धतीच्या माध्यमातून शिक्षण, संशोधन आणि रुग्ण सेवा या पैलूंबाबत युजी, पीजी आणि पोस्ट-डॉक्टरेट शाखेसाठी उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देईल. त्याद्वारे मोठय़ा जनसमुदायाला परवडण्यायोग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध होतील, असे सोनोवाल म्हणाले.

जगातील 53 देशांचे 4500 प्रतिनिधी

9 व्या जागतिक आयुर्वेद परिषदेच्या माध्यमातून आयुष वैद्यकीय प्रणालीची वैज्ञानिकता, परिणामकारकता आणि सामर्थ्य जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्यात येईल. या परिषदेत जगभरातील 53 देशांमधील सुमारे 4500 प्रतिनिधी सहभागी होणार असून त्यात 400 विदेशी प्रतिनिधींचा सहभाग असेल. त्याशिवाय 215 पेक्षा जास्त कंपन्या, प्रसिद्ध आयुर्वेद ब्रँड, औषध उत्पादक, तसेच आयुर्वेद संबंधित शैक्षणिक व संशोधन आणि विकास संस्था सहभागी होणार आहेत.

चार दिवसांच्या परिषद काळात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून आयुष संबंधी विविध चर्चासत्रे, जागतिक स्तरावरील मान्यवरांची व्याख्याने आणि सादरीकरण होईल, अशी माहिती सोनोवाल यांनी दिली.

Related Stories

गोवा महाराष्ट्र सीमेवर कडक पहारा ठेवा : मुख्यमंत्री

Omkar B

शेजारी राज्यातील भाविकांची पदयात्रा पोचली जुने गोवा सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्ताला

Amit Kulkarni

मिलिंद नाईक यांना वाचवण्यासाठी भाजप माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहे : संकल्प आमोणकर

Amit Kulkarni

ग्राहक कमी भाजीचे दर चढेच

Omkar B

बेतोडा-निरंकाल रस्त्यावर झाडे धोकादायक स्थितीत

Omkar B

मेहुण्याकडून भावोजीचा खून

Omkar B