Tarun Bharat

देशाच्या सशक्तीकरणात गोव्याची महत्त्वपूर्ण भूमिका!

केंद्रीय जहाजोद्योगमंत्री सर्वानंद सोनोवाल यांचे उद्गार : आत्मनिर्भरतेसाठी योगदान देणारा गोवा शक्तीशाली होईल

प्रतिनिधी /वास्को

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील जनतेला सशक्त भारत घडवण्याची संधी मिळालेली आहे. देशाची जनता या संकल्पपूर्तीसाठी निष्ठापूर्वक योगदान देत आहे. त्यात गोवा हा देशातील सुंदर प्रदेश महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. देवाचे वरदान लाभलेला हा प्रदेश देशात शक्तीशाली प्रदेश म्हणून समोर येईल असा विश्वास केंद्रीय बंदर, जहाजोद्योग व जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी व्यक्त केला. आत्मनिर्भर भारतासाठी गोवा राज्यसुद्धा आघाडीचे योगदान देत आहे, असेही ते म्हणाले.

मुरगाव बंदरात एमपीएने काल गुरुवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या मुरगाव बंदर प्राधिकरण तसेच न्यू मंगळूर पोर्ट प्राधिकरणाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच उद्घाटन समारंभात केंद्रीयमंत्री सोनोवाल प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, साबांखामंत्री नीलेश काब्राल, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, खासदार विनय तेंडुलकर, आमदार संकल्प आमोणकर, आमदार दाजी साळकर, एमपीएचे अध्यक्ष वेंकट रामण्णा अक्काराजू व उपाध्यक्ष गुरुप्रसाद राय उपस्थित होते.

या मान्यवरांच्या उपस्थितीत मुरगाव बंदरातील नियोजित अत्याधुनिक क्रूझ पर्यटक टर्मिनल प्रकल्पाची पायाभरणी तसेच एमपीएच्या उड्डाणपूल प्रकल्पाची पायाभरणी केंद्रीयमंत्री सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांच्याच हस्ते या समारंभात न्यू मंगळूर पोर्टच्या तीन प्रकल्पांचे उद्घाटन व दोन प्रकल्पांची पायाभरणी व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आली. या समारंभाला मुरगाव मतदारसंघातील लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

देवभूमी गोवा आता विकासात आघाडीवर

यावेळी बोलताना केंद्रीयमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी गोवा प्रदेशाची मुक्त कंठाने स्तुती केली. गोवा हा भारतातील जनतेच्या हृदयात असलेला प्रदेश आहे. या सुंदर प्रदेशाला देवाचे वरदान लाभलेले आहे. देशात या प्रदेशाची वेगळी ओळख आहे. हा प्रदेश आता विकासातही आघाडीवर असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विकासासाठी गोव्यातील जनतेची उत्तम साथ लाभत आहे. एवढेच नव्हे तर गोवा राज्य भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी निष्ठापूर्वक काम करीत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत देश जगात सशक्त बनवण्यासाठी जशी भारतीय जनतेची निष्ठापूर्वक साथ मिळत आहे, त्याचप्रमाणे गोवाही पंतप्रधानांच्या संकल्पपूर्तीसाठी कष्ट घेत आहे. या कार्यात गोवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. विकासासाठी गोव्याला केंद्र सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य मिळत राहणार आहे. देशात शक्तशाली राज्य म्हणून गोवा पुढील काळात समोर येईल, असेही ते  म्हणाले.

देशाच्या बंदरांच्या विकासासाठी सक्षम योजना तयार

केंद्र सरकारने देशाच्या बंदरांच्या विकासासाठी बहुयोजना आखलेल्या असून बंदर विकासातील आठशे नियोजित प्रकल्पांमध्ये मुरगाव आणि न्यू मंगळूर पोर्टचाही समावेश आहे. ही दोन्ही प्रमुख बंदरे देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. बंदरांच्या विकासाची पूर्ण क्षमता सरकारने ठेवलेली आहे.

नवीन टर्मिनलमुळे मुरगावात तीन हजार लोकांना रोजगार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ज्या दिवसाची गोव्यातील लोक वाट पाहात होते तो दिवस आज उगवल्याचे सांगून नवीन पर्यटक क्रूझ टर्मिनलमुळे मुरगावातील जनतेला अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे आश्वासन दिले. या बंदर विकासामुळे मुरगावमध्ये सुमारे तीन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मुरगाव बंदरात मोठय़ा प्रमाणात विदेशी, देशी पर्यटक जहाजे येऊ लागतील. खाणबंदीनंतर मुरगाव बंदराला आर्थिक फटका बसला. त्यामुळे पर्यायी माल वाहतुकीकडे वळण्याची गरज होती. ती सुरू झालेली आहे. आम्ही कोळसा वाहतुकीला संधी देणार नाही. येणाऱया चार वर्षांत मुरगावचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. दाबोळी विमानतळ चालूच राहील. कुणीही लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करू नये. वास्को रेल्वे, बंदर व विमानतळ अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत याचा आम्हाला गर्व आहे. पुढील विकास जनतेला विश्वासात घेऊनच करण्यात येईल. कुणीही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये असे मुख्यमंत्री म्हणाले.

नवीन टर्मिनल पर्यटनाला उभारी देणार- श्रीपाद नाईक

केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी बोलताना मुरगाव बंदरातील क्रूझ टर्मिनल प्रकल्प गोव्याच्या पर्यटन उद्योगाला नव्याने उभारी देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असा सुमारे तीन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल. माल वाहतुकीच्या सुलभ हाताळणीसाठी एमपीएने बायणा रेलयार्ड ते मुरगांव बंदरापर्यंत उड्डाणपुलाची उभारणी प्रकल्पामुळे वाहतुकीतील अडचणी दूर होणार असल्याचेही ते म्हणाले.

या समारंभाच्या प्रारंभी घोडेमोडणी नृत्य व  विविध सांस्कृतिक गीतांनी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. एमपीएचे अध्यक्ष वेंकट रामण्णा अक्काराजू यांनी उपस्थितांचे स्वागत करताना मुरगाव बंदरात होऊ घातलेल्या विकास प्रकल्पांमुळे गोव्याच्या होणाऱया आर्थिक विकासाची माहिती दिली. उपाध्यक्ष गुरूप्रसाद राय यांनी आभार मानले.

Related Stories

गोमेकॉतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची राखीवता रद्द

Amit Kulkarni

खूप दिवसांनी विश्रांती घेतली..!

Amit Kulkarni

चित्रशाळांमध्ये गणेशमूर्तीच्या कामांची लगबग

Omkar B

कणेरीसिद्ध आवण देवाचा उद्या वर्धापनदिन सोहळा

Amit Kulkarni

‘नवरंग लाईट हाऊस’ घरगुती उपकरणासाठी खात्रीशीर नाव

Amit Kulkarni

विमानतळ उद्घाटन कार्यक्रमात प्रवेश नाकारल्याने नाराजी

Patil_p