बकऱ्यांचा तुटवडा, मटणविक्रेते अडचणीत, बाजार सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी /खानापूर
मागील चार महिन्यांपासून लम्पीचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे जनावरांचा बाजार बंद केला आहे. याचबरोबर बकरी बाजारदेखील बंद आहे. परिणामी मटणविक्रेत्यांना बकरी मिळत नसल्याने मटणाचे दर भरमसाठ वाढले आहेत. शिवाय मटणाच्या विक्रीवरदेखील मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे बकरी बाजार तातडीने सुरू करून मटणविक्रेत्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी बेळगाव मटण शॉप असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.
लम्पीचा बकऱ्यांवर कोणताही परिणाम होत नाही. मात्र, केवळ अफवा आणि लम्पीच्या धास्तीने बकरी बाजार बंद आहे. याचा परिणाम मटणविक्रेत्यांवर झाला आहे. यरगट्टी, गोकाक, बैलहोंगल आदी ठिकाणी असलेले बकरी बाजार बंद झाल्याने बकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे मटणविक्रेत्यांना मिळेल त्या बकऱ्यांवर व्यवसाय चालविण्याची वेळ आली आहे. लम्पीचा बकऱ्यांवर कोणताही परिणाम होत नाही. शिवाय मटण खाण्यातही काही धोका नाही. त्यामुळे बकरी बाजार सुरळीत सुरू करावा, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणीदेखील मटण शॉप असोसिएशनने केली आहे.
सप्टेंबर दरम्यान लम्पीचा शिरकाव झाला होता. दरम्यान, प्रशासनाने जनावरांचा बाजार बंद करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून जनावरांच्या बाजाराबरोबर बकरी बाजारदेखील बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बकऱ्यांची विक्री आणि खरेदीदेखील थांबली आहे. त्यामुळे उलाढालीवर परिणाम झाला आहे. बकरी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांबरोबर विक्रेते, व्यापारी, दलालही अडचणीत आले आहेत. परिणामी मटण प्रतिकिलो 640 वरून 680 रुपयांवर गेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मटण खरेदी करणे मुश्कील बनले आहे. त्यातच मार्गशीर्ष महिना असल्याने मटणविक्री थंडावली आहे. लम्पीचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होऊ लागला आहे. शिवाय बकऱ्यांना लम्पीचा कोणताही धोका नाही. त्यामुळे बकरी बाजार सुरू करून मटणविक्रेत्यांना दिलासा द्यावा.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे
बकरी बाजार सुरू करावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप याची दखल घेतलेली दिसत नाही. बकऱ्यांची विक्री सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस खाते आडकाठी आणून जबरदस्तीने बाजार बंद करण्यास भाग पाडत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून बाजार सुरू करावा.
-उदय घोडके (मटण शॉप असोसिएशन अध्यक्ष)