देव तारी त्याला कोण मारी, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. तिचे प्रत्यंतर फिलिपिन्समधील एका आश्चर्यकारक घटनेमुळे मिळाले आहे. या देशात एका ठिकाणी भूस्खलन झाल्याने एक वसती जमिनीखाली दबली गेली. तथापि, 11 वर्षांचा एक बालक या जीवघेण्या घटनेतूनही आश्चर्यकारकरीत्या वाचला. तब्बल 20 तास तो फ्रिजमध्ये जिवंत राहिला. त्यानंतर साहाय्यता कार्याच्या माध्यमातून त्याची सुटका करण्यात आली. योग्य ते वैद्यकीय उपचार त्वरित केल्याने तो आता ठिकठाक आहे, असे त्याच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वी फिलिपिन्स या देशात मेगी नामक वादळाने हाहाकार माजविला होता. समुद्र तटावरील हजारो घरांमधील वीज गेली होती. तसेच या वादळामुळे काही ठिकाणी भूस्खलन होऊन लेटे प्रांतातील बेबे या शहरातील काही भाग जमिनीखाली दबला गेला. भूस्खलनामुळे जेस्मे नामक या मुलाच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे त्याला घरातून बाहेर पडता आले नाही. पाण्यात बुडू नये, यासाठी त्याने घरातील मोठय़ा फ्रिजमध्ये आसरा घेतला. वीज गेल्याने फ्रिज सुरू नव्हता. तरीही आत बरीच थंडी होती. तशा स्थितीतही त्याने 20 तास काढले. साहाय्यता कार्य करणाऱया दलाचे सदस्य जेव्हा त्याच्याजवळ पोहोचले, तेव्हा त्याने ‘मला भूक लागली आहे’ हे वाक्मय अर्धवट शुद्धीत उच्चारले. त्वरित त्याला द्रवरूप आहार देण्यात आला. त्यामुळे शक्ती संचय होऊन त्याची प्रकृती सुधारली. याच दुर्घटनेत त्याच्या पित्याचा मात्र मृत्यू झाला. या घटनेत 172 लोकांना जीव गमवाला लागला. तसेच 200 हून अधिक जण जखमी झाले. मात्र, जेस्मे याचे प्राण परमेश्वर कृपेने बचावले, अशी माहिती बेबे शहराच्या प्रशासनाकडून देण्यात आली.