भक्ताने बालगोपाळाची करविली ऍडमिशन, रोज लंचबॉक्स अन् गणवेश परिधान करून शाळेत
भक्त भगवानाबद्दल स्वतःची श्रद्धा वेगवेगळय़ा प्रकारे व्यक्त करत असतात. कुणी देवाचा फुलांनी श्रृंगार करतात, तर कुणी पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवतात. परंतु मथुरेत एका भक्ताची देवाबद्दल अनोखी श्रद्धा आहे. 65 वर्षीय रामगोपाल हे मूळचे दिल्लीचे रहिवासी आहेत. मुलांचे विवाह करून दिल्यावर त्यांचा भक्तीकडे ओढा वाढू लागल्याने 7 वर्षांपूर्वी पत्नीसोबत वृंदावनमध्ये दाखल झाले. येथूनच रामगोपाल स्वतःसोबत बालगोपाळ देखील घेऊन आले. बालगोपाळाला ते स्वतःचा दुसरा पुत्र मानतात.
4 वर्षांपूर्वी रामगोपाल हे भगवान बालगोपाळांसोबत इस्कॉन मंदिरात गेले होते. याचदरम्यान त्यांची भेट एका विदेशी कृष्णभक्त महिलेशी झाली. अन्य मुलांप्रमाणेच स्वतःच्या बालगोपाळाला शाळेत शिकवू इच्छितो, असे त्यांनी तिच्याशी बोलताना म्हटले होते. रामगोपाल यांची भक्ती पाहून या महिलेने त्यांना बालगोपाळाला संदीपन मुनींच्या शाळेत शिकविण्याचा सल्ला दिला. या शाळेत या विदेशी महिलेने पूर्वी काम केले होते.
रामगोपाल दुसऱयाच दिवशी बालगोपाळासोबत वृंदावनमधील या शाळेत पोहोचले. तेथे त्यांची भेट मुख्याध्यापिका दीपिका शर्मा यांच्याशी झाली. बालगोपाळाला शिकवू इच्छितो, असे त्यांनी सांगितल्यावर दीपिका अवाप् झाल्या. परंतु रामगोपाल यांचा आग्रह पाहून त्यांनी बालगोपाळाचे आधारकार्ड, जातप्रमाणपत्र, जन्मप्रमाणपत्र आणि अन्य दस्तऐवज आणण्यास सांगितले होते. त्यानंतर शाळेचे संस्थापक आणि इस्कॉन भक्त रुपा रघुनाथ दास यांना ते भेटले. प्रवेश मिळवून देऊ शकत नसला तरीही बालगोपाळाला शिकण्यासाठी पाठवू शकता, असे दास यांनी त्यांना सांगितले.
मुलांसोबत शाळेत
शाळेत पोहोचल्यावर बालगोपाळाचे नामकरण देखील झाले. येथे बालगोपाळला मुच्चउ गोपाल हे नाव मिळाले. मुच्चउ गोपाल अन्य मुलांप्रमाणेच वर्गात बसू लागले. शिक्षक मुलांसोबत मुच्चउ गोपाललाही शिकवू लागले. अन्य मुलांप्रमाणेच रामगोपाल स्वतःच्या बालगोपाळाला सकाळी तयार करतात. भगवानाचा श्रृंगार केल्यावर रामगोपाल त्याला शाळेच्या गणवेशाचा बेल्ट लावतात. पाण्याची बाटली आणि लंचबॉक्स देत त्याला हँड ट्रॉलीमध्ये बसवितात. मग शाळेची ई-रिक्षा येते आणि रामगोपाल देवाला घेऊन शाळेत पोहोचतात.
वर्गाबाहेर थांबतात रामगोपाल
शाळेत पोहोचल्यावर मुच्चउ गोपालाला नर्सरी वर्गात नेले जाते. तेथे अन्य मुलांदरम्यान एका स्टूलवर विराजमान केले जाते. 4 किंवा 5 तासांपर्यंत मुच्चउ गोपाल शाळेत राहतात. तितका वेळ रामगोपाल बाहेर बसून भजन गात असतात.