ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची सर्वसाधारण सभा येत्या २९ ऑगस्टला आयोजित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील सत्ताधाऱ्यांना आणि आताच्या विरोधकांना टोला लगावला. गोकुळच्या सर्वसाधारण सभेत यावेळी प्रत्येक सभासदाला समानधारक उत्तर दिले जाईल. त्याप्रमाणे नियोजन केले असून आम्ही मागील सत्ताधाऱ्यांप्रमाणे लवकर राष्ट्रगीत म्हणून सभा समाप्त करणार नाही, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला. ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुश्रीफ पुढे म्हणाले, गोकुळमध्ये सत्तांतर होऊन एक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. सर्व सभासदांचे समाधान होईल ही भूमिका आमची आहे. सत्ता आल्यानंतर संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले आहेत. त्यामुळे ४०० कोटींची उलाढाल असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
सत्तेत येण्यापूर्वी आम्ही म्हैस आणि गाईच्या दूध खरेदी दराला वाढ देऊ असं आश्वासन दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलं होतं. मात्र वर्षभरात आम्ही पाच ते सहा रुपयांची वाढ शेतकऱ्यांना दिली आहे. तसेच ५ कोटी लिटर दुधाची वाढ झाली. तर ११ कोटीची बचत झाली असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं