Dhananjay Mahadik on Satej Patil : जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ दूध संघ नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळचे शासकीय लेखा परीक्षण करण्याची मागणी केल्यानंतर गोकुळमध्ये पुन्हा एकदा राजकीय खळबळ होणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. त्यात आता खासदार धनंजय महाडिक यांनी देखील उडी घेतली असून, गोकुळ मधील भ्रष्टाचाराचा ‘दूध का दूध और पानी का पानी’ होऊन जाऊ दे असं वक्तव्य करून प्रशासक नेमण्याच्या हालचालींना अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलेला आहे.
राज्यात सत्ता होती त्यावेळी सतेज पाटलांनी गोकुळवर प्रशासक आणण्यासाठी जंग जंग पछाडले होते. आता गोकुळमध्ये त्यांची सत्ता आल्यानंचतर शेतकरी आणि गोकुळचे नुकसान होताना दिसत आहे. गेल्या गेल्या एक ते दीड वर्षात गोकुळमध्ये भ्रष्टाचार वाढला. तुम्ही सगळं करून बसला मात्र, तुम्हाला यश आलं नाही.आता दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे असा इशारा महाडिकांनी दिला. चाचणी लेखापरीक्षणानंतर गोकुळ मधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येईल असेही ते म्हणाले.
महापुरात संपर्क तुटू नये म्हणून यासाठी प्रस्तावित असलेला बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बास्केट ब्रिजची येत्या 28 जानेवारीला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन करुन पायाभरणी केली जाणार आहे.यासंदर्भात बोलताना महाडिक म्हणाले की, फ्लायओव्हरच्या माध्यमातून हा रस्ता व्हावा यासाठी मी प्रयत्न केले.त्यासाठी निधीदेखील मंजूर झाला. मात्र माझ्या पराभवानंतर दुर्दैवाने हा प्रकल्प थांबला.आता राज्यसभा खासदार झाल्यानंतर पुन्हा या प्रकल्पाची सुरुवात होतेय. 28 तारखेला या प्रकल्पाचा भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होईल.मी कोणत्याही प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याशिवाय त्याची वाच्यता करतनाही. विमानतळाच्या बाबतीत प्रयत्न करत असताना देखील विरोधकांनी टीका केल्या.मार्च महिन्यापासून सातही दिवस कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार असल्या कोणत्याही ब्रिजची संकल्पनाच नाही असा विरोधकांनी प्रचार केला होता. या ब्रिज नंतर कोल्हापूरच्या वैभवात भर पडणार आहे.

