वृत्तसंस्था/ प्याँगताएक, द.कोरिया
भारताचा पॅरा पॉवरलिफ्टर अशोक मलिकने आशिया ओसेनिया पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 65 किलोपर्यंतच्या वजन गटात सुवर्णपदक पटकावले. याशिवाय वैयक्तिक गटातही त्याने कांस्यपदक मिळविले.
अशोक मलिकने एकूण 491 किलो वजन उचलत सुवर्ण पटकावले. चीनच्या यि झोयूने (390 किलो) व इराणच्या जफारी अरनगेहने (382 किलो) अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळविले. वैयक्तिक विभागात मलिकने 173 किलो वजन उचलत कांस्य मिळविले. मलिकने सातत्यपूर्ण प्रदर्शन करताना अंतिम गटात तीनदा यशस्वी लिफ्ट करणारा तो एकमेव स्पर्धक ठरला. त्याने पहिल्या लिफ्टमध्ये 150 किलो वजन उचलल्यानंतर नंतरच्या दोन प्रयत्नात 168 व 173 किलो असे एकूण 491 किलो वजन उचलले.
वैयक्तिक विभागात चीनच्या झोयूने शेवटच्या प्रयत्नात 196 किलो वजन उचलत सुवर्ण मिळविले. इराणच्या अरनगेहने 195 किलो वजनासह रौप्य व मलिकने (173) कांस्यपदक मिळविले. आदल्या दिवशी गुरुवारी अनुभवी पॅरा पॉवरलिफ्टर फरमान बाशाने पुरुषांच्या 54 किलोपर्यंतच्या वजनगटात रौप्यपदक मिळविले.