वृत्तसंस्था/ हिसार
येथे झालेल्या पुरुषांच्या इलाईट राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचा अव्वल मुष्टीयोद्धा शिवा थापा तसेच मोहमद हुसामुद्दीन यांनी आपल्या वजन गटात सुवर्णपदके मिळवली. तर या स्पर्धेतील विद्यमान चॅम्पियन्स सेनादलाने सर्वंकष विजेतेपद पुन्हा आपल्याकडे राखले.
या स्पर्धेत माजी विजेत्या सेनादलाने 10 पदकांची कमाई करत पदक तक्त्यात आघाडीचे स्थान मिळवले. आतापर्यंत सहावेळा आशियाई स्पर्धेत पदक मिळवणारा आसामचा शिवा थापाने 63.5 किलो वजनगटातील अंतिम लढतीत रेल्वेच्या अंकित नरवालचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. नरवालने 2021 च्या विश्व युवा मुष्टीयुद्ध स्पर्धेत कास्यपदक मिळवले होते. सेनादलाच्या मोहमद हुसामुद्दीनने 57 किलो वजन गटातील अंतिम लढतीत आरएसपीबीच्या सचिनचा 4-1 अशा गुणफरकाने पराभव सुवर्णपदक घेतले. गेल्या वर्षी हुसामुद्दीनला या स्पर्धेत अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान 92 किलो वरील गटात नरेंद्रला अंतिम फेरीसाठी सागरकडून पुढे चाल मिळाली. दुखापतीमुळे सागरने या स्पर्धेतून माघार घेतली.
सेनादलाच्या स्पर्धकांनी या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली आहे. या संघाने 6 सुवर्ण 1 रौप्य आणि तीन कास्यपदकाची कमाई करत सांघिक जेतेपेद पटकावले. सेना दलाच्या विश्वामित्र सी. तसेच सचिन, आकाश आणि सुमीत यांनी सुवर्णपदके पटकावली. रेल्वेने 2 सुवर्ण, तीन रौप्य आणि 2 कास्य त्याचप्रमाणे पंजाबने 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कास्यपदके मिळवली. रेल्वेने दुसरे तर पंजाबने तिसरे स्थान या स्पर्धेत घेतले आहे.