Tarun Bharat

निखत झरीन, पॉल, अमित, नीतू, भाविना यांना सुवर्णपदके

Advertisements

तिहेरी उडीत ऐतिहासिक यश, संदीप कुमार,अन्नू राणी, दीपक नेहरा यांना कांस्य

वृत्तसंस्था/ बर्मिंगहम

शनिवारप्रमाणे रविवारीही भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांची लयलूट कायम ठेवत तब्बल पाच सुवर्णपदकांची कमाई केली. पुरुषांच्या तिहेरी उडीत सुवर्ण व रौप्य मिळवित ऐतिहासिक यश नोंदवले तर मुष्टियुद्धमध्ये अमित पांघल व नीतू गंगहास यांनी सुवर्णयश मिळविले. महिलांच्या पॅरा टेटेमध्ये स्टार टेटेपटू भाविना पटेलने एकेरीचे सुवर्ण पटकावले. महिला बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीननेही सुवर्णपंच मारत भारताला 17 वे सुवर्ण जिंकून दिले. याशिवाय संदीप कुमारने पुरुषांच्या 10000 मी. चालण्याच्या शर्यतीत, अन्नू राणीने महिलांच्या भालाफेकमध्ये, मल्ल दीपक नेहराने पुरुषांच्या 97 किलो फ्रीस्टाईलमध्ये कांस्यपदक मिळविले. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू व लक्ष्य सेन यांनी सुवर्णपदकाच्या फेरीत स्थान मिळविले तर किदाम्बी श्रीकांतला कांस्यपदकासाठी लढावे लागणार आहे. श्रीजा अकुलाचे कांस्य मात्र थोडक्यात हुकले.

पुरुषांच्या तिहेरी उडीमध्ये भारतीय ऍथलेट्सनी नवा इतिहास घडविताना पहिले दोन्ही क्रमांक पटकावले. केरळच्या एल्डहोस पॉल व अब्दुल्ला अबूबाकर यांनी हे यश मिळवून दिले. पॉलने तिसऱया प्रयत्नात 17.03 मीटर्सची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत ट्रक अँड फील्डमधील दुर्मीळ सुवर्णपदक पटकावले. त्याचाच सहकारी अबूबाकरने 17.02 मी. उडी घेत रौप्यपदक निश्चित केले. पाचव्या प्रयत्नात त्याने हे अंतर नोंदवले. बर्मुडाच्या जॅह एन्हाल पेरिनचीफने 16.92 मी. अंतर नोंदवत कांस्यपदक मिळविले. यापूर्वी या स्पर्धेत भारताने तिहेरी उडीमध्ये चार पदके पटकावली होती. मात्र या प्रकारात एकाचवेळी दोन पदके मिळविण्याची ही पहिलीच वेळ ठरली. मोहिंदर सिंग गिलने 1970 व 1974 मध्ये कांस्य मिळविले  होते तर रेंजित महेश्वरी व अर्पिंदर सिंग यांनी अनुक्रमे 2010 व 2014 मध्ये कांस्यपदकच मिळविले होते.

बॉक्सर नीतू, पांघलचे सुवर्णयश

महिलांच्या बॉक्सिंगमध्ये नीतू जी.ने 48 किलो वजन गटात आणि पुरुषांच्या 51 किलो वजन गटात (फ्लायवेट) अमित पांघलने सुवर्णपदक पटकावले. पांघलने मागील आवृत्तीत रौप्यपदक मिळविले होते. त्याने यावेळी त्याहून पुढे मजल मारत सुवर्णयश मिळविले. अंतिम फेरीत त्याने युरोपियन चॅम्पियनशिप रौप्यविजेत्या इंग्लंडच्या कायरन मॅकडोनाल्डचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. मॅकडोनाल्ड पांघलपेक्षा उंच होता. पण तरीही पांघलने त्याला त्याचा फायदा घेऊ दिला नाही. शेवटच्या फेरीत मॅकडोनाल्डने मोठी जखम झाली असली तरी आक्रमण तेज केले होते. पण त्याला गुण मिळविण्यात अपयशच आले.

21 वर्षीय नीतूने इंग्लंडच्या 2019 वर्ल्ड चॅम्पियन कांस्यविजेत्या डेमी जेड रेझस्टनवर 5-0 अशी मात करीत सुवर्ण पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेत ती प्रथमच सहभागी होती. 9 मिनिटांच्या या अंतिम लढतीत तिने पूर्ण नियंत्रण ठेवले होत प्रतिस्पर्धीला फारशी संधी दिली नाही. तिने अचूक पंचेसचा वापर करीत सुवर्णयश मिळविले.

Birmingham: Boxer Nikhat Zareen with the gold medal after winning the final of 48kg-50kg (Light Flyweight) boxing match, at the Commonwealth Games 2022 in Birmingham, UK, Sunday, Aug 7, 2022. Zareen won the gold medal. (PTI Photo/Swapan Mahapatra)(PTI08_07_2022_000352B)

वर्ल्ड चॅम्पियन आता राष्ट्रकुल चॅम्पियनही !

भारताची वर्ल्ड चॅम्पियन महिला बॉक्सर निखत झरीनने महिलांच्या 50 किलो लाईट फ्लायवेट गटात सुवर्णपदक पटकावताना अंतिम फेरीत तिने उत्तर आयर्लंडच्या कार्ली एमसी नॉलचा 5-0 असा एकतर्फी धुव्वा उडविला. भारताचे हे एकूण 17 वे सुवर्णपदक हेते. या यशाच्या आधारे पदकतक्त्यातही भारताने चौथ्या स्थानी झेप घेतली होती.

भाविना पटेलला पॅरा टेटेचे सुवर्ण

महिलांच्या पॅरा टेबलटेनिसमध्ये भारताची स्टार पॅरा टेटेपटू भाविना पटेलने महिला एकेरीतील क्लास 3-5 मध्ये सुवर्ण मिळविले. गुजरातच्या या 35 वर्षीय खेळाडूने टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये रौप्यपदक मिळविले होते. येथे तिने नायजेरियाच्या इफेचुकवूदे ख्रिस्तियानाचा 12-10, 11-2, 11-9 असा पराभव केला. 2011 थायलंड ओपन पॅरा टेटे स्पर्धेत वैयक्तिक रौप्य जिंकत तिने जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळविले होते. याशिवाय 2013 मध्ये झालेल्या बीजिंग आशियाई पॅरा टेटे चॅम्पियनशिपमध्ये सिंगल क्लास 4 मध्ये रौप्य जिंकले होते. 2017 मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या आशियाई पॅरा टेटे स्पर्धेतही तिने कांस्यपदक मिळविले होते.

सोनलबेनला कांस्य

आणखी एक पॅरा टेटेपटू 34 वर्षीय सोनलबेन पटेलनेही भारताला पदक मिळवून देताना कांस्यपदक जिंकले. तिने महिलांच्या सिंगल क्लास 3-5 मध्ये कांस्यपदकासाठी झालेल्या प्लेऑफमध्ये इंग्लंडच्या स्यू बेलीचा 11-5, 11-2, 11-3 असा पराभव केला. मात्र पुरुषांच्या सिंगल क्लास 3-5 मधील कांस्यपदक प्लेऑफमध्ये भारताच्या राज अरविंदन अलगरला पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्याचे कांस्य हुकले. नायजेरियाच्या इसायू ओगुनकुनलेकडून त्याला 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला. याआधी पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीरने भारताला सुवर्ण मिळवून दिले आहे. पॅरा टेटेमध्ये 1-5 हे क्लास व्हीलचेअर खेळाडूंसाठी घेतले जातात.

Related Stories

ऑस्ट्रेलियन संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकपदी व्हेटोरी

Patil_p

रोहितच्या खात्यावर असाही नामुष्कीजनक विक्रम

Patil_p

जर्मनीच्या विजयाला पोर्तुगालचाही हातभार!

Patil_p

बहरातील लाबुशानेचे चौथे शतक

Patil_p

सिंधू, दीपिका कुमारी, पूजा राणीचे धडाकेबाज विजय

Patil_p

भारत-इंग्लंडचे सर्व खेळाडू कोरोना चाचणीत निगेटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!