वृत्तसंस्था/ कैरो (इजिप्त)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या रायफल-पिस्तूल 2022 च्या विश्व कनिष्ठांच्या नेमबाजी स्पर्धेत शनिवारी भारताच्या नेमबाजांनी एक सुवर्ण आणि एक रौप्यपदकाची कमाई केली.
कनिष्ठांच्या 10 मी. पिस्तूल मिश्र नेमबाजी प्रकारात भारताच्या इशा सिंग आणि सम्राट राणा यांनी सुवर्णपदक मिळविताना भारताच्या शिखा नरवाल आणि सागर डांगी यांचा 17-15 असा पराभव केला. भारताच्या या चार नेमबाजांनी या क्रीडा प्रकारात अंतिम फेरी गाठली होती. इशा सिंग आणि सम्राट राणा यांनी सुवर्ण तर शिखा नरवाल आणि सागर डांगी यांनी रौप्यपदक मिळविले. या स्पर्धेत शनिवारी जर्मनीच्या आणि चीनच्या नेमबाजांनी दोन कास्यपदके मिळविली. जर्मनीच्या सेलिना बेकर आणि आंद्रेस कोपी तसेच चीनच्या शेन आणि लियू यांनी ही कास्यपदके घेतली. महिलांच्या 25 मी. पिस्तूल नेमबाजीत भारताच्या रिदम सांगवानला संयुक्त पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागल्याने तिला 2024 च्या पॅरीस ऑलिम्पिक कोटा पद्धतीने हुलकावणी दिली.