वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मेक्सिकोतील लिऑन येथे सुरू असलेल्या आयडब्ल्यूएफ युवा विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या गुरुनायडू सेनापतीने सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारा तो भारताचा पहिलाच युवा वेटलिफ्टर आहे.
16 वर्षीय गुरुनायडूने मुलांच्या 55 किलो वजन गटात एकूण 230 किलो (104 व 126 किलो) वजन उचलले. 2020 आशियाई युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्येही त्याने कांस्यपदक मिळविले होते. सौदी अरेबियाच्या अली मजीदने 229 (105 व 124) किलो वजन उचलत रौप्य व कझाकस्तानचा येरासील उमरोव्हने 224 (100 व 124) किलो वजन उचलत कांस्यपदक मिळविले.
भारताची अन्य एक स्पर्धक सौम्या एस. दळवीने आपल्या वजन गटात कांस्यपदक मिळविले. महाराष्ट्राच्या दळवीने खेलो इंडिया युवा स्पर्धेत दोनदा सुवर्णपदके मिळविली आहेत. तिने मुलींच्या 45 किलो वजन गटात एकूण 148 (65 व 43) किलो वजन उचलत तिसरे स्थान मिळविले. फिलिपाईन्सच्या रोज जे. रॅमोसने 155 (70 व 85) किलो वजन उचलत सुवर्ण व व्हेनेझुएलाच्या केरलीस एम. मोन्टिलाने 153 (71 व 82) किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले. भारताच्या आर. भवानीला मात्र आठवे स्थान मिळाले. तिने एकूण 132 किलो वजन उचलले.
या स्पर्धेत भारताची आता चार पदके झाली असून पहिल्या दिवशी आकांक्षा व्यवहारे व विजय प्रजापती यांनी आपापल्या गटात रौप्यपदके मिळविली. गेल्या वर्षी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या स्पर्धेत भारताने भाग घेतला नव्हता.