Tarun Bharat

जमैकाच्या शेली ऍन प्रेजर प्राईसला सुवर्ण,

Advertisements

वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप ः 100 मी.मध्ये जमैकाचे क्लीन स्वीप

वृत्तसंस्था/ ओरेगॉन, अमेरिका

जमैकाच्या शेली ऍन प्रेजर प्राईसने वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नवा स्पर्धाविक्रम नोंदवत महिलांच्या 100 मी. शर्यतीचे सुवर्णपदक पटकावले. या शर्यतीत जमैकाच्या धावपटूंनीच तीनही पदके पटकावत क्लीन स्वीप साधले. याशिवाय ग्रँट हॉलोवे, तमिरात तोला, ब्रूक अँडरसन यांनीही विविध क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळविले.

विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन असणाऱया प्रेजर प्राईसने या शर्यतीत पहिले तर शेरिका जॅक्सनने रौप्य व इलेन थॉम्पसन हेराहने कांस्यपदक मिळविले. प्रेजर प्राईस पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनली असून तिने 10.67 सेकंदात शर्यत पूर्ण करीत नवा स्पर्धाविक्रम नेंदवला. प्रेजर प्राईस या मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये असून तिने या वर्षातील सर्वात वेगवान वेळही नोंदवली आहे. मात्र तिला तिचीच सहकारी थॉम्पसन हेराहकडून कडवा प्रतिकार झाला. थॉम्पसन हेराहने रिओ ऑलिम्पिकमध्ये 100 व 200 मी.ची सुवर्णपदके मिळविली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती तिने टोकियो ऑलिम्पिकमध्येही केली होती. या दोघींना आता आणखी एक सहकारी जॅक्सनच्या प्रतिकारालाही सामोरे जावे लागत आहे. गेल्या जूनमध्ये झालेल्या जमैकन चाचणी स्पर्धेत जॅक्सनने 100 व 200 मी. शर्यती जिंकल्या होत्या. त्यात 200 मी. मध्ये तिने तिसरी सर्वात जलद वेळ नोंदवली होती.

असे असले तरी प्रेजर प्राईसने आपला दर्जा पुन्हा एकदा दाखवून दिला. ग्रेट ब्रिटनच्या दिना ऍशन स्मिथला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. याशिवाय स्थानिक फेव्हरिट धावपटू ऍलीया हॉब्स व मेलिसा जेफरसन यांनीही भाग घेतला होता. 35 वर्षीय प्रेजर प्राईसने 10.67 से. वेळ या मोसमात तीनदा नोंदवली आहे.

गोळाफेकमध्ये क्राऊजरला विक्रमासह सुवर्ण

पुरुषांच्या गोळाफेकमध्ये दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन ठरलेल्या रेयान क्राऊजरने सुवर्णपदक पटकावले. या क्रीडाप्रकारातही अमेरिकेच्या तीनही खेळाडूंनी पहिली तीन पदके पटकावली. क्राऊजरने 22.94 मी. गोळाफेक करीत पहिले स्थान पटकावत नवा स्पर्धाविक्रमही नोंदवला. क्राऊजरने पाचही प्रयत्नांत 22 मीटर्सहून अधिक गोळाफेक केली. त्याने पहिल्या फेरीत 22.21 मी. अंतर नोंदवले. पण याच फेरीत जो कोव्हॅक्सने 22.63 मी. फेक करीत त्याला मागे टाकले. त्याचाच सहकारी जोश अवोतुन्देने 22.24 मी. गोळा फेकत क्राऊजरला तिसऱया स्थानावर फेकले. विश्वविक्रमधारक असणाऱया क्राऊजरने दुसऱया फेरीत 22.71 मी. फेक करीत पुन्हा पहिले स्थान मिळविले. वर्ल्ड इनडोअर चॅम्पियन रोमानीने 21.90 मी. गोळाफेक करीत चौथे स्थान घेतले. क्राऊजरने यानंतरच्या फेऱयांत 22.58 व 22.16 मी. फेक केली तर कोव्हॅक्सनेही दोनदा 22 मीटर्सहून अधिक अंतर नोंदवले. रोमानीने किंचित सुधारणा करीत 21.92 मी. अंतर नोंदवले. टॉम वॉल्श व अवोतुन्दे यांनीही 22 हून अधिक मीटर्सचे अंतर नोंदवल्यानंतर प्रोत्साहित झालेल्या कोव्हॅक्सने 22.89 मी. गोळा फेकत आघाडी घेतली. शेवटच्या प्रयत्नात मात्र त्याने 22.42 मे. अंतर नोंदवले, मात्र क्राऊजरचा 22.94 मी.चा सर्वोत्तम थ्रो त्याला पार करता आला नाही. कोव्हॅक्सला रौप्य व जोश अवोतुन्देला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मॅरेथॉनमध्ये तमिरात तोला विजेता

युजीन येथे झालेल्या पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या तमिरात तोलाने शेवटच्या आठ किमीमध्ये जोर लावत सुवर्णपदक पटकावले. 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने 10,000 मी.मध्ये कांस्यपदक तर 2017 लंडन मॅरेथॉनमध्ये रौप्य मिळविले होते. त्याने नवा चॅम्पियनशिप विक्रम नोंदवताना 2 तास 5 मिनिटे 37 सेकंदाचा अवधी घेतला. त्याने केनियाच्या अबेल किरुईचा 2009 बर्लिनमध्ये नोंदवलेला 2ः06.54 वेळेचा विक्रम मागे टाकला. तोलाचा देशवासी मोसिनेत जेरेम्यूने 2ः06.45 वेळ नोंदवत रौप्य व बेल्जियमच्या बशिर अब्दीने 4 सेकंद जास्त अवधी घेत कांस्यपदक मिळविले.

हॉलोवेने जेतेपद राखले

अमेरिकेच्या ग्रँट हॉलोवेने पुरुषांच्या 110 मी. हर्डल्सचे जेतेपद स्वतःकडेच राखण्यात यश मिळविले. जमैकाचा ऑलिम्पिक चॅम्पियन हँसल पार्चमेट वार्मअपवेळी जखमी झाला तर देव्हॉन ऍलेनने चुकीचा स्टार्ट केल्याने त्याला अपात्र ठरविण्यात आले. हॉलोवेनेने 13.03 सेकंदात ही शर्यत पूर्ण करीत सुवर्ण मिळविले. त्याचाच देशवासी ट्रे कनिंगहॅमने रौप्य व स्पेनच्या एसियर मार्टिनेझने कांस्यपदक मिळविले.

महिलांच्या हातोडाफेकमध्ये अमेरिकेच्या ब्रूक अँडरसनने 78.96 मी. फेक करीत सुवर्ण पटकावले. कॅमरीन रॉजर्सने 75.52 मी. हातोडा फेकत तिसऱया फेरीत आघाडी घेतली होती. पण अँडरसनने चौथ्या फेरीत 77.42 मी. फेक करीत आघाडी घेतली. पाचव्या फेरीत 77.56 मी. आणि शेवटच्या प्रयत्नात तिने हे अंतरही मागे टाकत सुवर्ण निश्चित केले. तिचीच देशवासी जेनी कॅसानाव्हॉईडने कांस्य तर कॅनडाच्या रॉजर्सने रौप्यपदक मिळविले.

Related Stories

बुमराहच्या विवाह सोहळय़ासाठी फक्त 20 निमंत्रित!

Patil_p

लक्ष्य सेन मानांकनात सहावा

Patil_p

सुनील चेत्रीचे पुनरागमन, भारतीय संघ दोहास रवाना

Patil_p

कोरोनामुक्त अमलराजचा सराव शिबिरात सहभाग नाही

Patil_p

बांगलादेश, थायलंड यांचे थरारक विजय

Patil_p

भारताची रविना उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p
error: Content is protected !!