वार्ताहर/ मडकई
कासवाडा तळावली येथील श्री गोपाळकृष्ण गजानन मंदिरच्या मूर्ती स्थापनेचा सुवर्ण महोत्सव 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त पाच दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गजानन देवस्थान समिती व कला आणि संस्कृती संचालनालय यांच्या सयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत हा कार्यक्रम जाहीर केला.
यावेळी कार्याध्यक्ष मिथील सुदिन ढवळीकर, निमंत्रक प्रदीप शेट, देवस्थान समीतीचे अध्यक्ष विश्वास नाईक, सचिव महेश नाईक, सहसचिव अमित नाईक, सदस्य साईश नाईक आदी उपस्थित होते. गुरुवार 27 रोजी सकाळी 9.30 वा. राज्यपाल ई श्रीधरन पिल्लाई यांच्याहस्ते सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. यावेळी तिस्क उसगांव येथील शिव संस्कृती प्रतिष्ठानच्या ढोल ताशे पथक आणि युवा कला मोगी कासवाडा यांचे ‘एकचाराचे नमन’ होईल. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, कार्याध्यक्ष मिथील ढवळीकर यांची यावेळी उपस्थिती असेल. दुपारी 12 वा. युवा कला मोगी महिला आरती मंडळातर्फे घुमट आरत्या, तिर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. सायंकाळी 5 वा. ‘स्वर गणेश’ हा भक्ती संगीताचा कार्यकम होईल. रात्रौ 8. वा घुमट आरत्या व महापत्यानंतर 9 वा. प्रसाद कांबळी पुणे प्रस्तुत ‘सं. देवबाभळी’ हा नाटय़प्रयोग सादर होईल.
शुक्रवार 28 रोजी सकाळी श्रींची पालखीतून मिरवणूक व दुपारी महाप्रसाद होईल. सायं. 7 फोंडा वारकरी सांप्रदायतर्फे हरिपाठ, रात्री 8 वा. महाप्रसाद, नंतर 9.30 वा. सुदेश नाईक व साथी कलाकारातर्फे ‘भजन संध्या’ हा कार्यक्रम होईल. त्यानंतर सुहासिंनींकडून श्रींची ओवाळणी व पालखीचे मंदिरात आगमन, आरत्या. पावणी व तीर्थप्रसाद होईल.
शनिवार 29 रोजी सकाळी श्रीस अभिषेक, दुपारी 12 वा. श्री गोपाळकृष्ण गजानन आरती मंडळातर्फे घुमट आरत्या व महाप्रसाद, दुपारी 3 वा. मानिला क्रियेशन फुगडी मंडळ, तरवळे शिरोडा व गोपाळकृष्ण फुगडी मंडळ देऊळवाडा बोरी यांच्यातर्फे फुगडी सादरीकरण, सायंकाळी 5 वा. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी महाराष्ट्र येथील कीर्तनकार ह. भ. प. शरदबुवा घाग यांचे कीर्तन होईल. सायं. 7 वा कृषीमंत्री रवी नाईक, कला सांस्कृतीकमंत्री गोविंद गावडे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर व समाजसेवक मिथील ढवळीकर यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा सन्मान सोहळा होईल. रात्री 8 वा. श्री केळबाय सातेरी आरती मंडळ कुर्टीतर्फे घुमट आरती, पावणी व महाप्रसाद. रात्री 9 वा. पुणे येथील सुप्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील यांचा गायनाचा कार्यक्रम होईल.
रविवार 30 रोजी सकाळी श्रीस अभिषेक, सामूहिक महापूजा, आरती, पावणी व महाप्रसाद होईल. सायंकाळी 5 वा. कीर्तनकार शरदबुवा घाग यांचे कीर्तन, सायं. 7 वा. सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष सिद्धेश श्रीपाद नाईक, समाजसेवक मिथील ढवळीकर आदी मान्यवरांच्या उपस्थित सन्मान सोहळा. रात्री 8 वा. श्री जय श्रीहरी आरती मंडळ काले सांगेतर्फे घुमट आरती, पावणी व महाप्रसाद होईल. रात्री 9 वा. श्री ओंकार थिएटर्स पेडणे प्रस्तुत ‘सं. कटय़ार काळजात घुसली’ हा नाटय़प्रयोग सादर होईल.
सोमवार 31 रोजी सकाळी श्रीस अभिषेक दुपारी 12 वा. श्री गोपाळकृष्ण गजानन आरती मंडळातर्फे घुमट आरती व महाप्रसाद, नंतर सरस्वती कला मंडळ केळबाय कुर्टीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम होईल. सायं. 5 वा. ह. भ. प. शरदबुवा घाग यांचे कीर्तन, 7 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री सुदिन ढवळीकर व मिथील ढवळीकर यांच्या उपस्थितीत मान्यवारांचा सन्मान सोहळा, रात्री 8 वा. श्री महामाया आरती मंडळ शिरोडातर्फे घुमट आरत्या, व महाप्रसाद होईल. त्यानंतर कलारंजन मुंबई निर्मीत ‘मराठी पाऊल पडती पुढे’ सा संगीत रजनी कार्यक्रम होईल.