Tarun Bharat

पहिल्या ध्वजारोहणाचा तो सुवर्णक्षण आजही डोळय़ांसमोर..!

94 वर्षीय निवृत्त मुख्याध्यापिका मालती साळोखे यांची पहिल्या स्वातंत्र्यदिनाची आठवण

Advertisements

कोल्हापूर / कृष्णात पुरेकर

पहिल्या स्वातंत्र्यदिनाची पहाट… कोल्हापुरात पहाटेपासूनच प्रभात फेऱया निघालेल्या.. नगरपालिकेच्या इमारतीत लगबग सुरू झालेली. खासबागेतील अहिल्याबाई होळकर शाळा… सकाळी आम्ही शाळेत पोहोचलो, तसा शाळेचा ड्रेस नव्हताच, पण मिळेल ती कपडे घालून प्रत्येकजण आलेला.. आम्ही सहावीच्या वर्गातील विद्यार्थिनी.. वर्गमैत्रिणींनी पटांगणात रांगोळी काढली, सारे रांगेत उभारलो. हेडमास्तरीण बेकरबाईच्या हस्ते ध्वजारोहण झाले, राष्ट्रगीत गायिले.. अन् ‘भारतमाता की जय..’च्या मोठमोठय़ाने घोषणा दिल्या अन् याच सुवर्णक्षणी मन स्वातंत्र्याच्या कल्पनेने फुलून गेले… आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही पहिल्या स्वातंत्र्यदिनाचा तो सुवर्णक्षण जसाच्या तसा डोळयासमोर उभा आहे… पहिल्या स्वातंत्र्यदिनाची आठवण सांगत होत्या..

94 वर्षीय निवृत्त मुख्याध्यापिका मालती माधवराव साळोखे…

शनिवार पेठेतील समाजकृपा बेकरीची इमारत हे मालतीताईंचे घर.. निवृत्त मुख्याध्यापिका मालतीताई साळोखे.., त्यांची आजही घोरपडे हेडमास्तरीण अशीच ओळख…. वयाच्या 94 व्या वर्षीची त्यांची वाणी खणखणीत, अन् उच्चारही स्पष्ट.. त्यांनी आपली जन्मतारीख स्पष्टपणे 14 जुलै 1929 अशी सांगितलीच, शिवाय नावही सांगितले. नुकताच त्यांचा 93 वा वाढदिवस झाला. यानिमित्ताने त्यांच्याशी गप्पांचा पट रंगला अन् नव्या-जुन्या कोल्हापुरातील आठवणी त्यांनी शेअर केल्या. त्यापैकीच एक पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाची..त्याच्याच शब्दांतील…
मालती साळोखेंचे माहेर कर्नाटकातील मुधोळ जिल्हय़ातील यादवाड… आईचे नाव येंकूबाई, वडिलांचे नाव जोतिबा पवार. जमखंडीत आजोबांनी मालतीताईंना दत्तक घेतले अन् त्या घोरपडे झाल्या, आजोबांनी त्यांना कोल्हापुरात शिक्षणासाठी पाठवले. ताराराणी बोर्डिंगमध्ये त्या दाखल झाल्या, अन् त्यांचे शिक्षण पालिकेच्या खासबागेतील अहिल्याबाई होळकर शाळेत सुरू झाले. सातवीपर्यत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी बी.टी. कॉलेजमध्ये ‘बॅचरल ऑफ टीचर’चा अभ्यासक्रम पूर्ण केला, अन् त्यांनी पालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाल्या. त्यांचा विवाह वयाच्या 27 व्या वर्षी कोल्हापुरातील माधवराव साळोखे यांच्याशी झाला.

पद्माराजे शाळेतून त्यांनी शिक्षकी पेशाला सुरूवात केली अन् याच शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या. 94 व्या वर्षीही त्या स्वतःची कामे स्वतः करतात. पहिल्या स्वातंत्र्यदिनाची आठवण त्यांनी सांगितल्या. शिक्षकी पेशात असताना स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवी ध्वजारोहणाला उपस्थित राहण्याची संधी त्यांना मिळाली. निवृत्तीनंतर सुवर्णमहोत्सवी ध्वजारोहणासाठी त्या उपस्थित राहिल्या होत्या, अन् अमृत महोत्सवी ध्वजारोहणाचा क्षण आता त्या घरातून अनुभवणार आहेत.

पंडित नेहरुंशी झालेली पहिली भेट स्मरणात…

मालतीताईंच्या जीवनातील सर्वांत महत्वाची आठवण म्हणजे पंडीत नेहरूंची भेट.. शाळेत असताना पंडीत नेहरूंनी 1945 च्या दरम्यान नेहरूंनी अहिल्याबाई होळकर शाळेलाही भेट दिली. यावेळी त्यांनी नेहरूंकडून वहीत सुविचार लिहून घेतला…‘सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना…’ बऱयाच विद्यार्थिनीतून त्यांची नेहरूंशी झालेली भेट या सुविचारामुळे लक्षात राहिली.

15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला, त्यावेळी सहावीच्या वर्गात शिकत होते. सकाळपासून प्रभातफेऱया निघत होत्या. ‘भारतमाता की जय अन् वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमत होता. मिळेल त्या पेहरावात शाळेत पोहोचलो. यावेळी शाळेतही स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू होती. विद्यार्थी पताका लावत होते, विद्यार्थिर्नीनी रांगोळी काढली, त्यानंतर हेडमास्तरीण बेकरबाई, टोपकर मास्तर, जमेनीस, गोंधळीबाई आल्या. त्यावेळी शाळेत 40 ते 50 जण होतो. बेकरबाईनी तिरंगा फडकवला अन् राष्ट्रगीत गायिले. ‘वंदे मातरम् अन् भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. बोर्डिंगमध्ये येताना रस्त्यावरील स्वातंत्र्याच्या उत्साहाचे ते क्षण टिपले. शाळेतील तो पहिला स्वातंत्र्यदिन अन् तो उत्साह आजही डोळयासमोर रेंगाळतोय..

Related Stories

थेट पाईपलाईनने वर्षअखेरीस `गॅस’

Abhijeet Shinde

कोल्हापूर : १५ व्या वित्त निधी वाटपाबाबत दुसरी याचिका दाखल

Abhijeet Shinde

वॉर रूम…माणसं मारायला केलीय काय?

Abhijeet Shinde

Kolhapur; राजकीय स्वरूप न देता गणेशोत्सव साजरा करू : उपविभागीय अधिकारी गोसावी

Abhijeet Khandekar

चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्याचा आनंद मोठा; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे उद्गार

Abhijeet Shinde

कबनूरात आणखी चार पॉझिटिव्ह एकूण बाधित संख्या पंधरावर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!