शेकडो हायस्पीड ट्रॉलर्सचा धुमाकूळ
मालवण / प्रतिनिधी-
समुद्रातील वातावरण मासेमारीस अनुकूल होताच परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी सिंधुदुर्गातील गोल्डन पॉईंटवर डल्ला मारायला सुरूवात केली आहे. परराज्यातील शेकडो हायस्पीड ट्रॉलर्स सिंधुदुर्गच्या हद्दीत घुसखोरी करून मत्स्यधनाची लूट करीत आहेत. शुक्रवारी दिवसभर अगदी दहा वावाच्या आतमध्ये हे ट्रॉलर्स मासेमारी करीत होते. मत्स्य विभागाची गस्ती नौका अद्याप कार्यान्वित न झाल्याने या ट्रॉलर्सना रान आणखीनच मोकळे झाले आहे. सिंधुदुर्गला लाभलेल्या समुद्रात विविध प्रकारचे मासे सापडून येतात. परंतु परराज्यातील हायस्पीडट्रॉलर्सना न रोखल्यास सिंधुदुर्गातील मच्छीमारांवर भविष्यात मत्स्य दुष्काळाचे संकट ओढवेल, अशी भीती स्थानिक मच्छीमारांनी व्यक्त केली.