दिमाखदार सोहळ्याने उघडणार इफ्फीचा पडदा
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यासह राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय रसिक, चाहते आणि सिनेप्रेमींना उत्कंठा लागून राहिलेल्या इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पडदा आज उघडणार असून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर दुपारी होणाऱया दिमाखदार सोहळ्याने उद्घाटन होणार आहे. या महोत्सवासाठी 7 हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधी आणि 118 पेक्षा जास्त सेलेब्रिटीज उपस्थित राहणार असून त्यांच्या स्वागतासाठी मोरांचे विश्व ल्यालेली राजधानी नगरी सज्ज झाली आहे. महोत्सवात 79 देशांमधील 339 फिचर आणि 248 नॉन फिचर चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. त्याशिवाय गोवा, फ्रान्स आणि स्पेन येथील डान्स पथकांकडून 14 सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरणही होणार आहे. महोत्सवात यंदा स्पेनचे दिग्गज दिग्दर्शक कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
इफ्फीसाठी राजधानी नववधूप्रमाणे सजली आहे. दिवजा सर्कलपासून मिरामार सर्कलपर्यंत मोरांच्या कलाकृतीसह कमानी, स्टॉल्स अशी आकर्षक सजावट करण्यात आली असून त्याला विद्युतरोषणाईचा साज चढविण्यात आला आहे. ठिकठिकाणी एलईडी क्रीन बसविण्यात आले आहेत. महोत्सवाचा केंद्रबिंदू असलेला आयनॉक्स थिएटर परिसराची शान तर काही औरच असून एखाद्याच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा झगमगाट तेथे पहावयास मिळत आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत शेवटचा हात फिरवून सजावटीची ही सर्व कामे पूर्ण करण्यात आली.
आयनॉक्स चित्रपटगृहाच्या परिसरात रेड कार्पेट अंथरण्यात आले असून दुपारी 2 वाजल्यापासून त्यावरून पाहुण्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर चित्रपटांचे प्रदर्शन प्रारंभ होईल. ‘अल्मा अँड ऑस्कर’ या डिएटर बर्नेर यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन तर क्रिस्झटॉफ झानुसीच्या ‘परफेक्ट नंबर’ या चित्रपटाने सांगता होईल.
उद्घाटन सोहळा रविवार दि. 20 रोजी सायं. 5 वा. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियवर होणार असून राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी अभिनेता वरूण धवन, सारा खान, कार्तिक आर्यन, मृणाल ठाकूर, अमृता खानविलकर, कॅथरिन ट्रेसा, यांच्याकडून रंगारंग कार्यक्रम सादर करण्यात येईल.
मणिपुरी सिनेमा यंदा 50 वर्षे पूर्ण करत असल्याने महोत्सवात 5 विशेष मणिपुरी चित्रपट दाखविण्यात येतील. अन्य चित्रपटांमध्ये शैक्षणिक, युनिसेफ, ऍनिमेशन व भयपट, तसेच दोन वेब सिरीज आणि प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या 10 चित्रपटांचा समावेश असेल. महोत्सवाच्या माध्यमातून अर्जेंटिनाचे 7 चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यात ‘सुवर्ण मयूर’ च्या स्पर्धेत असलेला ‘सेव्हन डॉग्ज’, सेल्फ डिफेन्स, मिस विबोर्ग, द बॉर्डर्स ऑफ टाईम्स, द सबस्टिटय़ूट, रोब ऑफ जेम्स, आणि इआमी आदी चित्रपटांचा समावेश आहे.
त्याशिवाय मांडवीच्या तिरावर फिल्म बाजार भरविण्यात येणार असून तो सर्वांसाठी खुला असणार आहे. गोमंतकीय चित्रपट निर्मात्या तरुणांसाठी मास्टरक्लास घेण्यात येणार असून आशा पारेख, प्रसून जोशी, आर. बाल्की, नवाजुद्दीन सिद्दीकी, अनिल मेहता, ऑस्कर अकादमी तज्ञ शेखर कपूर, आर बाल्की, ए आर रहमान, नवाजुद्दीन सिद्दीकी यांची सत्रे होतील. या मास्टरक्लासमधून निर्मित चित्रपटांचे सादरीकरण होईल. तसेच दिव्यांगासाठी कार्यशाळा, गोमंतकीय कला संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला, कार्निव्हल-शिमगोत्सव परेड अशा कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
गोव्यात झालेल्या पहिल्या इफ्फीच्या धर्तीवर यंदा गावागावात चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे. असे एकूण 14 चित्रपट दाखविण्यात येणार असून त्यात व्यावसायिक तसेच मनोरंजनात्मक चित्रपटांचा समावेश असेल.
महोत्सवात गोमंतकीय विभागात ‘अर्दो दीस’, ‘बिफोर आय स्लीप’, ‘निमण्या दिसा’, ‘विन्ड चाईम्स’, ‘द व्हाईट ड्रीम’, ‘द व्हाईट शर्ट’ हे सहा लघुपट आणि ‘गोंयमुक्तीचें होमखण’ हा पूर्ण चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
महोत्सवास हजेरी लावणाऱया सेलेब्रिटीमध्ये प्रभुदेवा, ए. आर. रेहमान, सुनिल शेट्टी, अजय देवगण, क्रिती सेनन, शेखर कपूर, नवाजुद्दीन सिद्दीकी, मणिरत्नम, पंकज त्रिपाठी, परेश रावल, अक्षय खन्ना, कल्की कोचलीन, अनुपम खेर, यामी गौतम, आदी भारतीय तर मेहंदी हसन, एमिली कॉक्स, जेनेसिस रॉड्रिग्ज, नातालिया लोपेझ, डॅनियल गोल्डहेबर, मार्क ऑस्बोर्न आदी आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटींचा समावेश आहे.