Tarun Bharat

गोमंतक भंडारी समाजाच्या आरोग्य शिबिराचा 119 रुग्णांना लाभ

प्रतिनिधी /म्हापसा

गोमंतक भंडारी समाजातर्फे आरजी इस्पितळ पर्वरीच्या सहकार्याने म्हापसा येथील प्रगती संकुलमध्ये आयोजित केलेल्या आरोग्य चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह इतर वयोगटातील 119 नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन तपासणी करून घेतली.

महिलांसाठी स्त्रीरोग तज्ञ, मधुमेही रुग्णांसाठी रक्ततपासणी, नेत्रचिकित्सा, ईसीजी अशा विविध आजारांवर उपचार करण्यासाठी एकूण 8 तज्ञ डॉक्टरांनी या शिबिरात तपासणी व सल्ला दिला. शिबिराचे उद्घाटन आरजी इस्पितळाच्या डॉ. शर्मिला प्रभूदेसाई यांच्याहस्ते दीपप्रज्वलीत करून करण्यात आले. यावेळी गोमंतक भंडारी समाजाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक नाईक, महिला अध्यक्ष तथा म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, सचिव संध्या पालयेकर, सरचिटणीस फक्रू पणजीकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महिलांनी वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर आरोग्याची पूर्ण तपासणी करून घेण्याचा सल्ला डॉ. शर्मिला प्रभूदेसाई यांनी यावेळी बोलताना दिला. हल्ली महिलांमध्ये गुडघेदुखी, अस्थमा, गर्भाशयाचे विकार वाढत आहेत. त्यासाठी सरकारी दवाखान्यात किंवा अन्य डॉक्टरकडे वेळोवेळी तपासणी करून घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. अशोक नाईक यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात गरीब लोकांना आरोग्याविषयी जागृती व्हावी व त्यांना वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी हे शिबिर आयोजित केल्याचे सांगितले. भंडारी समाजातर्फे साठ वर्षात पहिल्यांदा असे शिबिर घडवून आणण्यात आले आहे. यापूर्वी महिला विभागातर्फे रोपांचे वितरण, युवा विभागातर्फे रक्तदान शिबिर असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत.

आज आरोग्याबाबत प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज असून त्यासाठी येणाऱया काळात फोंडा व अन्य ठिकाणी अशी शिबिरे आयोजित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. फोंडय़ात भंडारी समाजाचे नेते व कृषीमंत्री रवी नाईक यांनी 240 खाटांचे प्रशस्त असे उपजिल्हा इस्पितळाची उभारणी करून जनतेला दिलासा दिलेला आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही गोमेकॉत सर्व प्रकारच्या अद्ययावत वैद्यकीय सुविधा व तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध करून दिल्याने गोव्यातील नागरिकांना राज्यातच चांगली सेवा मिळत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फक्रू पणजीकर यांनी तर सचिव आनंद शिरोडकर यांनी आभार मानले.

Related Stories

भाजपच्या कोणत्याच उमेदवाराला मतदान न करण्याचा टॅक्सी चालकांचा निर्णय

Patil_p

डिचोली साखळीत माटोळीचा बाजार फुलला

Amit Kulkarni

सामाजाच्या सहकार्याने उभे राहणारे कार्य प्रेरणादायी

Amit Kulkarni

‘ओरबिन’ ला मिळेल साहित्य अकादमीचा पुरस्कार

Omkar B

गोवा डेअरी वर्षभरात राज्यातील दुध संकलन 1 लाख लिटरवर नेणार

Amit Kulkarni

व्हेन्झी, सिल्वा बनणार गोमंतकीयांचा आवाज

Omkar B