अमिताभ बच्चन अन् रश्मिका मंदाना एकत्र
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाद्वारे स्वतःचा आगामी चित्रपट ‘गुड बाय’चे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन हे पतंग उडविताना दिसून येतात. तर रश्मिका मंदाना त्यांच्याशेजारी दिसून येत आहे. या चित्रपटाद्वारे अमिताभ बच्चन अन् रश्मिका पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. हा चित्रपट 7 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘कुटुंबाची साथ सर्वात खास असते. जेव्हा कुणीच सोबत नसते तेव्हाही त्यांची जाणीव असते’ असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी हा चित्रपट 7 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. हा एक कौटुंबिक कहाणी दर्शविणारा चित्रपट असू शकतो.
नीना गुप्ता मुख्य भूमिकेत
चाहत्यांना अमिताभ अन् रश्मिका यांचा हा लुक अत्यंत पसंत पडला आहे. चित्रपटात या दोघांसोबत नीना गुप्ता देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाद्वारे अमिताभ अन् नीना यांची जोडी दिसून येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रश्मिका मंदाना ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
आगामी चित्रपट
रश्मिकाला ‘पुष्पा’ चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी ओळखले जाते. या चित्रपटामुळे तिचे देशभरात चाहते निर्माण झाले आहेत. ‘गुड बाय’सह ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनु’ चित्रपटात काम करत आहे. तर रणवीर कपूरसोबत ‘ऍनिमल’ चित्रपटात ती दिसून येणार आहे. अमिताभ बच्चन यांचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.