दाक्षिणात्य चित्रपटांना लाभतोय विशेष प्रेक्षकवर्ग : निखळ मनोरंजन करणाऱया चित्रपटांना गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनानंतर बेळगावात चित्रपटगृहांना ‘अच्छे दिन’ आले असून हळुहळु प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. अलीकडे दाक्षिणात्य चित्रपटांना विशेष प्रेक्षकवर्ग लाभत आहे. ‘फायर है मै’ या डायलॉगने तरुणाईला आकर्षित करून पुष्पाला ‘लक्षणीय गर्दी लाभली.
पुष्पासह आरआरआर, केजीएफ या चित्रपटांनासुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला. ते तेलगु चित्रपट असले तरी हिंदीमध्ये डब केल्याने चित्रपटगृहांमध्ये गर्दी दिसून येत आहे. जे चित्रपट प्रेक्षकांचे पूर्ण मनोरंजन करू शकतात अशा चित्रपटांकडे प्रेक्षकांचा कल वाढला आहे. कश्मीर फाईल्सलासुद्धा असाच प्रतिसाद मिळाला.
चित्रपटगृह चालक अविनाश पोतदार यांच्या मते कोरोनामुळे सर्व व्यवसाय लॉकडाऊननंतर सुरू झाले तरी चित्रपटगृहांना परवानगी मिळण्यास विलंब झाला. आता हळुहळु आमचा व्यवसाय पूर्वपदावर येत आहे. लोकांना कोरोनाकाळात अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागले. त्यामुळे निखळ मनोरंजन करतील असेच चित्रपट त्यांना हवे आहेत. छत्रपती शिवराय हे तर दैवत आहे. त्यामुळे पावनखिंड या चित्रपटाला प्रतिसाद मिळाला. तसाच प्रतिसाद आता ‘शेर शिवराय’ चित्रपटालाही मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रकाश चित्रपटगृहाचे संचालक मदन कोसंदल यांनीसुद्धा शिवरायांच्यावर चित्रित केलेल्या सर्वच चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळतो, असे सांगितले. दरम्यान, ज्ये÷ गायक वसंतराव देशपांडे यांच्यावरील ‘मी वसंतराव देशपांडे’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला असून एक कलात्मक कलाकृती म्हणून त्याचा आस्वाद घ्यायला हवा.
पहाटे 6 वाजता लावलेल्या चित्रपटालासुद्धा प्रेक्षकांची गर्दी
अलीकडे आयटी कंपन्यांमुळे कामाचे स्वरुप व वेळ बदलली आहे. त्यामुळे चित्रपटासाठी तीन तास देणे काहींना शक्मय होत नाही. यामुळेच प्रयोग म्हणून पहाटे 6 वा. लावलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी गर्दी केली. बेळगावमध्ये दि. 15 रोजी केजीएफ चित्रपट ग्लोबमध्ये पहाटे 6 वा. प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे या वेळेला प्रेक्षकांचा लक्षणीय प्रतिसाद मिळाला. हा प्रयोग मुंबई, पुण्याबरोबरच बेळगावमध्येही यशस्वी ठरला, असे दिसून आले.