कोयना धरण काठोकाठ भरले, नियंत्रणासाठी दरवाजे साडेतीन फुटांवर उचलून विसर्ग सुरू
प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शंभरीच्या टप्पा ओलांडलेले कोयना धरण आता काठोकाठ भरले असून धरण आता कोणत्याही क्षणी पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे राज्यातील जनतेसाठी ही आनंदाची बातमी मानली जात आहे.
दरम्यान, काठोकाठ भरलेल्या धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी बुधवारी सकाळी धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांवरून साडेतीन फूट वर उचलून त्यातून प्रतिसेकंद 31 हजार 531 व पायथा वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून एक हजार 50 असे एकूण 32 हजार 581 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
दरम्यान, कोयना नदीच्या पाणीपातळीत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .
कोयना पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर वाढल्याने धरणात येणाऱया पाण्याची आवकही वाढत आहे. परिणामी धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारी धरणाचे सहा वक्री दरवाजे दीड फूट वर उचलून कोयना नदीत विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिकच वाढू लागल्याने धरणातील पाणी साठा निर्धारित पाणीपातळीपेक्षा अधिक वाढत आहे. परिणामी बुधवारी सकाळी 11 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांवरून साडेतीन फूट वर उचलण्यात आले आहेत.
धरण पूर्ण भरण्यासाठी केवळ अर्धा टीएमसीची गरज
बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणात 104.06 टीएमसी पाणीसाठा असून पाणीपातळी 2162.7 फूट, 659.155 मीटर इतकी झाली आहे. सध्या धरणात प्रतिसेकंद सरासरी 39 हजार 905 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयना येथे 4258 मिलिमीटर, नवजा 5182 मिलिमीटर व महाबळेश्वर येथे 5517 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ अर्धा टीएमसी पाण्याची गरज आहे.