प्रतिनिधी /मडगाव
भाजप युवा मोर्चा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विकास तीर्थ रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. भाजप सरकारने उभारलेल्या प्रकल्पासंदर्भात जागृती करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे उद्गार नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी या रॅलीचा शुभारंभ करताना काढले.
फातोर्डा येथील दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटल ते नावेली येथील मनोहर पर्रीकर इंडोर स्टेडियम पर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. आमदार उल्हास तुयेकर यांनी झेंडा दाखवून या रॅलीचा शुभारंभ केला.
यावेळी बोलताना आमदार श्री. तुयेकर म्हणाले की, भाजप सरकारने गोव्यात अनेक प्रकल्प साकारले त्यात फातोर्डा दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटल, नावेली येथील मनोहर पर्रीकर इंडोर स्टेडियम, झुवारी व मांडवी नदीवरील नवीन पूल, शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रकल्प राबविले आहेत. तसेच सर्व सामान्य व गरीब जनतेला मदत करण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत.
केंद्रात पुन्हा मोदीच्या नेतृत्वाखालील सरकार
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपलाच सत्ता मिळणार हे स्पष्ट असून केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्पष्ट बहुमताने सत्तेवर येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशासाठी दिलेले योगदान खुपच महत्वाचे आहे. आज त्यांनी विकासाची गंगा देशभरात पोचविली आहे.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी अखिल पर्रीकर यांनी ही आपले विचार मांडले. ते म्हणाले की, केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर देश खऱया अर्थाने बलवान बनला आहे. आज जगभरातील इतर देश भारतकांकडे एक शक्तीशाली देश म्हणून बघत आहे.
या रॅलीची नावेली येथे सांगता झाली. त्यावेळी भाजपचे सरचिटणीस व फातोर्डाचे आमदार दामू नाईक यांनी रॅलीला मार्गदर्शन करताना, केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्याने गोव्याचा सर्वागिण विकास होत असल्याचे सांगितले. आज देशाला नरेंद्र मोदीच्या रूपाने खणखर असे नेतृत्व लाभले असून देश प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.
या रॅलीत मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे, युवा मोर्चाचे पदाधिकारी रघुवीर शिरोडकर, प्रराग रायकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.