पाचव्या-सहाव्या दिवशी मोठय़ा संख्येने गणपतींचे विसर्जन : नदीतीरावर गणेशभक्तांची गर्दी
वार्ताहर /काकती
रविवारी पाच दिवस व शनिवारी सहावा दिवस असलेल्या गणरायाला ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत घरगुती गणपतीना काकती, होनगा येथील भाविकांनी जडअंतःकरणाने निरोप दिला.
रविवार पाच दिवसाचा व सोमवारी सहाव्या दिवशी मुळा नक्षत्र असल्याने दुपारपासून विसर्जनाला प्रारंभ झाला. काकती येथील थोरला तलाव तर मार्कंडेय नदीतिरावर श्री गणेशभक्तांची गर्दी दाटली होती. सोमवारी दुपारी पावसाच्या उघडिपीनंतर गणरायाला निरोप देण्याची लगबग सुरू होती.
घरगुती गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी दुपारी शाळेला सुटी देऊन मोठय़ांसह चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काहीजण डोकीवर ठेऊन, फटाक्यांची आतषबाजी करत चालत होते. तर काही भाविक रिक्षा, मिनीडोअर, टेम्पो, चारचाकी, दुचाकी घेऊन आले होते. पारंपरिक पोशाख परिधान करून सारे कुटुंब मोठय़ा भक्तीभावाने जडअंतःकरणाने गणरायाला निरोप देत होते.