फिनिक्स चषक फुटबॉल स्पर्धा : इस्लामिया, सेंट पॉल्स, चिटणीस संघाची आगेकूच
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिल आयोजित दहावी फिनिक्स चषक 13 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या बाद फेरीतील सामन्यातून गुडशेफर्डने संत मीराचा, भरतेश सेंट्रलने पोतदार इंटरनॅशनलचा, एमव्हीएमने फिनिक्स पब्लिकचा, सेंट पॉल्सने बाशीबनचा तर जीजी चिटणीसने केएलएसचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
कनक मेमोरियल स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या फिनिक्स चषक बाद फेरीतील पहिल्या सामन्यात गुडशेफर्ड संघाने संत मीरा संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 12 व्या मिनिटाला दक्ष मुलेने पहिला गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात शेफर्डच्या सौरभ सालुखेने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात संत मीरा संघाने गोल करण्याच्या संधी वाया घालविल्या.
दुसऱया सामन्यात भरतेश सेंट्रल संघाने पोतदार इंटरनॅशनल संघाचा 2-0 असा पराभव केला. तिसऱया सामन्यात एमव्हीएम संघाने फिनिक्स पब्लिक संघाचा सडनडेथमध्ये 4-3 असा पराभव केला. तर वेदांत रूद्र, अविराज यांनी चेंडू बाहेर मारले. त्यानंतर पंचानी सडनडेथ नियमाचा वापर केला. त्यामध्ये एमव्हीएमने 4-3 असा विजय मिळविला. एमव्हीएमतर्फे विजयी गोल वरद देसाईने केला तर फिनिक्सच्या संदीपने चेंडू बाहेर मारला.
चौथ्या सामन्यात इस्लामिया संघाने ज्ञान प्रबोधन मंदिर संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात दुसऱया सत्रात 32 व्या मिनिटाला रियान पटवेकरने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. पाचव्या सामन्यात सेंट पॉल्स संघाने बाशीबन संघाचा 5-0 असा पराभव केला. तिसऱया मिनिटाला आराध्य नाकाडीने पहिला गोल केला. दहाव्या मिनिटाला सीनसी गोडदने दुसरा गोल केला. 26, 32 व 40 व्या मिनिटाला श्रेयस तरळेने सलग 3 गोल करून 5-0 असा विजय मिळवून दिला. सहाव्या सामन्यात जीजी चिटणीसने केएलएसचा 1-0 असा निसटता पराभव केला. सोमेश्वर चिकमठने एकमेव विजयी गोल केला.
मंगळवारचे उपांत्यपूर्व सामने – भरतेश सेंट्रल वि. सेंट झेवियर्स सकाळी 9 वा., कनक मेमोरियल वि. गुडशेफर्ड सकाळी 10 वा., इस्लामिया वि. जीजी चिटणीस स. 11 वा., सेंट पॉल्स वि. एमव्हीएम दु. 12 वा.