प्रतिनिधी/ कराड
कराडच्या गोळेश्वरचे सुपूत्र, देशाचे पहिले ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधव यांची 15 जानेवारीला 97 वी जयंती होती. यानिमित्ताने गुगलने ऑलिम्पिकवीर खाशाबांवर डुडल बनवत सर्वांना भारताला कुस्तीतील पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणाऱया खाशाबा जाधव यांचा परिचय करून दिला. गुगलने डुडलद्वारे पै. खाशाबा जाधवांना ही मानवंदना दिली.
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त गुगलने आज डुडल केले. खाशाबा जाधव कुस्ती खेळताना दाखवून खाशाबा हे एक महान कुस्तीपटू होते, अशा शब्दात गुगलने त्यांचा गौरव केला आहे. हे डुडल आज समाजमाध्यमांवर व्हायरल होत होते. त्यामुळे संपूर्ण जिल्हय़ात विशेषतः कराड शहर व तालुक्यात आनंद व्यक्त करण्यात आला.
गुगलने खाशाबांची दखल घेतल्याने 97 व्या जयंतीदिनी त्यांचे सुपूत्र रणजित पाटील यांनी समाधान व्यक्त केले. गुगलने खाशाबांची दखल घेतली. पण केंद्र सरकारने अजून घेतलेली नाही, अशी प्रतिक्रिया कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली होती. याबाबत रणजित पाटील म्हणाले की, संभाजीराजेंनी जी खंत व्यक्त केली, त्यात चूक काय आहे. त्यांच्याच आजोबांनी खाशाबांना 1948 साली मदत केली. राजाश्रय दिला. त्यामुळे खाशाबांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत देशाला पहिले पदक मिळवून दिले. आज गुगलने खाशाबांची दखल घेतली. खाशाबांच्या कामगिरीला आंतरराष्ट्रीय पातळीवर उजाळा मिळाला.