वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेसाठी सराव प्रशिक्षण दौऱयाचे आयोजन भारतीय टेबल टेनिस संघासाठी केले आहे. भारतीय टेबल टेनिस संघामध्ये दहा सदस्यांचा समावेश असून 3 ते 10 जुलै दरम्यान होणाऱया सराव प्रशिक्षण दौऱयाला केंद्र शासनाने अधिकृत परवानगी जाहीर केली आहे. अचंता शरथ कमलच्या नेतृत्वाखाली भारतीय टेटे संघ पोर्तुगालला जाणार आहे.
पोर्तुगालच्या दौऱयासाठी भारतीय टेटे संघात पाच पुरूष आणि 5 महिलांचा समावेश असून या संघासमवेत दोन प्रशिक्षक राहतील. भारतीय टेटे संघामध्ये शरथ कमल, सनील शेट्टी, जी साथीयन, हरमीत देसाई, मनुश शहा, श्रीजा अकुला, रीत टेन्नीसन, मनिका बात्रा, दिया चितळे आणि स्वस्तिका घोश यांचा समावेश आहे. गेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत भारतीय टेबल टेनिस संघाने सांघिक गटातील जेतेपद मिळविताना एकूण तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कास्यपदक मिळविले होती.