Tarun Bharat

संकटाच्या काळात सरकार कुठेच दिसत नाही

पुणे / प्रतिनिधी :

राज्यात ओला दुष्काळ आणि पूर परिस्थितीचे संकट ओढवले आहे. विदर्भ, मराठवाडय़ासह सर्वत्रच शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र, संकटाच्या काळात राज्यातील सरकारचे अस्तित्त्वच कोठे दिसत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Mundeयांनी केली. एका कार्यक्रमासाठी मुंडे पुण्यात आले असता, माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मुंडे म्हणाले, अतिपावसामुळे ऊस पीक वगळता शेतकऱ्यांच्या हाती कोणतेही पीक लागलेले नाही. शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार उशिरा केला. पालकमंत्र्यांची घोषणा उशिरा केली. त्याचा फटका शेतकऱयांना बसत आहे. कोणतीही पीक विमा कंपनी शेतकऱ्याला दिलासा द्यायला तयार नाही. 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या ठिकाणी अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा, अशी आमची मागणी आहे. गेल्या वषी अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने अनुदान दिले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा सोयाबीन पिकासाठी पीक विम्याची रक्कम आगाऊ देण्यात आली. शिंदे-फडणवीस सरकारने ही भूमिका घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून जमणार नाही. आज शेतकरी उद्विग्न झाला असून, राज्य सरकारने त्यांची परीक्षा पाहू नये, असे आवाहन मुंडे यांनी केले.

अधिक वाचा : ‘सितरंग’ बांग्लादेशकडे वळणार, महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमीच

या सरकारमधील मंत्री राज्यात कोठेच फिरताना दिसत नाहीत. सध्याच्या संकटाच्या काळात या सरकारचे अस्तित्त्व राज्यात कोठेच दिसत नाही. विरोधी पक्ष आवाज उठवत आहे. पण, सरकारने मदत करायचीच नाही, असे ठरवले आहे. हे सरकार जनतेच्या हितासाठी नाही, तर स्वतःच्या स्वार्थासाठी अस्तित्त्वात आले आहे. त्यामुळे त्यांना स्वार्थाव्यतिरिक्त काहीच दिसत नाही, असा आरोप करून धनंजय मुंडे म्हणाले, दिवाळीसाठी एक हजार रुपयात शिधा देण्याची घोषणा केवळ लोकप्रियतेसाठी आहे. कोणालाही दिवाळीपूर्वी हजार रुपयांत शिधा मिळालेला नाही. भारतीय जनता पक्ष संबंध देशात प्रादेशिक पक्षाचे अस्तित्त्व संपविण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपविण्याचा प्रयत्न अनेकदा केला. मात्र, त्यांनी दहा वेळा जन्म घेतला तरीही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस फोडता येणार नाही,’ असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.

लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला एक महत्त्वाचे स्थान असते. विरोधीपक्षनेते पद हे संविधानिक पद आहे. त्या पदावरील व्यक्तीने एखादी मागणी केली, तर त्याकडे राजकारण म्हणून दुर्लक्ष करणे, हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला परवडणारे नाही, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

जिल्हा बँकेला 149 कोटी 22 लाख करपूर्व नफा

Patil_p

पुणे विभागातील 56, 414 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

जिल्ह्यात नव्याने ४२ कोरोना बाधित, रामवाडी येथील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यु

Archana Banage

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 12 ऑगस्टला

Archana Banage

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार

datta jadhav

राजीव सातव यांची प्रकृती स्थिर ; राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची माहिती

Archana Banage