फेंडय़ात कामगार दिनी सरकारी योजना व कायदा मार्गदर्शनाचे एकछत्री महाशिबिर उत्साहात : मंत्री रवी नाईक यांच्याहस्ते असंघटीत कामगारांना ई-श्रम कार्डाचे वितरण
प्रतिनिधी /फोंडा
असंघटीत क्षेत्रातील कामगारांना कायद्याविषयी माहिती कमी असते, त्याना त्याच्या अधिकाराविषयी माहिती दिल्यानंतरच लोकशाही सदृढ बनेल. त्यासाठी कायद्याचे ज्ञान व सरकारच्या इतर योजनाबद्दल जनजागृती होणे अंत्यत गरजेचे आहे. गोवा राज्य कायदा सेवा प्राधिकरणातर्फे सामान्य नागरिकांसाठी कायद्याचे ज्ञानासह सरकारी योजनाची एकछत्री मार्गदर्शन महाशिबिरे भविष्यातही होत राहिल्यास कायदा, अंमलबजावणी व न्यायपालीकाच्या सहाय्याने गोवा राज्यातील असंघटीत कामगारामध्ये निर्माण झालेली मरगळ दूर होईल असा विश्वास मुंबई उच्च न्यायालय गोवा खंडपीठाचे न्यायाधीश तथा कायदा सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष न्या. महेश सोनक यांनी व्यक्त केला.
1 मे कामगारदिनाचे औचित्य साधून गावा राज्य कायदा सेवा प्राधिकारणातर्फे फोंडा येथील राजीव कला मंदिरात काल रविवारी आयोजित केलेल्या ‘नालसा’ योजनाच्या महाशिबिरात ते बोलत होते. यावेळी कृषि मंत्री रवी नाईक, क्रीडा मंत्री गोविंद गावडे, गोव्याचे ऍडव्हॉकेट जनरल देवीदास पांगम, उच्च न्यायालय ऍडव्हॉकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. ज्यैईल ई पेरेरा, उत्तर गोवा ऍडव्हॉकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष नेल्सन सुवारिस, दक्षिण गोवा ऍडव्हॉकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद नाईक, फोंडा तालुका ऍडव्हॉकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. विवेक मावजोकर तसेच जिल्हा सत्र व इतर न्यायलयाचे न्यायाधीश देशपांडे व ईर्शाद आगा व इतर वकिल उपस्थित होते. असंघटीत कामगारापर्यंत कायदा सेवा पोचणे हे ‘नालसा’ हे उद्दिष्टय़ आहे. नालसा फक्त कायद्याची सेवा देण्यापुरते मर्यादीत न राहता प्रत्येक वंचितांला सोयीसुविधा मिळावी यासाठी नेहमी झटत आलेली आहे.
महाशिबिराअंतर्गत असंघटीत कामगारांना एका छताखाली विविध सरकारी कार्यालयाच्या अधिकाऱयाची सोय करण्यात आली होती. त्याशिवाय मोफत आरोग्य शिबिरातही मोठया संख्येने सहभाग दर्शविला. महिला व बालकल्याण खाते, कृषि खाते, समाज कल्याण खात्यातील योजनांची माहिती अधिकाऱयानी दिली. सरकारच्या योजना लाभार्थीपर्यंत पोचाव्या हा एकमेव हेतू या महाशिबिरातून साध्य़ करणे असल्याचे न्या. सोनक यानी स्वागतपर भाषणात म्हटले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून कामगारदिनी शुभेच्छा संदेश
महाशिबिराला मुख्यमंत्री डॉ. सावंत पोचू न शकल्याने त्यांनी आपला संदेश पाठवून दिला होता. ऍडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा संदेश वाचून दाखविला. या संदेशात मुख्यमंत्र्यानी सर्वाना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. श्रमिकांचा शोषण रोखण्य़ासाठी आपले सरकार प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकार तुमच्या दारी सारखे उपक्रम राज्यभरात सुरू असून या महाशिबिरात स्वयंपुर्ण युवासह स्वयंपुर्ण गोवा हे ध्येय साधण्यासाठी असंघटीत कामगारांना सुरक्षा प्रदान करणे हे आपल्या अंत्योदय तत्वावर चालणाऱया सरकारचे दायित्व असल्याचे त्यानी संदेशात म्हटले आहे.
राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरण असंघटीत कामगारांना पुरविते सुरक्षा
पिडीतांचा आवाज बळकट करण्यासाठी राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकारण (नालसा) या नावाने परिचित आहे. तसेच राज्यात राज्य सेवा, जिल्हा, तालुका स्तरावर कायदा सेवा प्राधिकरण सेवा कार्यरत आहेत. न्याय सेवा फक्त कायदा सेवा पुरत्या मर्यादीत नसून सर्वस्तरावर सरकारी योजना लाभार्थीपर्यंत पोचविण्यासाठी कार्यरत आहेत. आपत्कालीन घटनेतील पिडीत, लैगिक शोषणातील पिडीत, असंघटीत कामगारांचे प्रलंबित प्रश्न, बाल सुरक्षा, दिव्यांग व मानसिक रूग्णांना सुरक्षा, दारिद्र रेषेखालील नागरिकांसाठी कायदा सेवा, आदिवासी क्षेत्रातील लोकांच्या अडचणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदा सेवा पुरविण्याकडे काम नालसा राष्ट्रीय स्तरावरून करीत आहे.
मान्यवरांच्याहस्ते दिप प्रज्ज्वलन व त्यानंतर ढवळी येथील लोकविश्वास प्रतिष्ठानच्या विद्यार्थी व बांबोळी येथील मुष्टीफंड कुजिरा विद्यालयाच्या विद्यार्थ्यातर्फे स्वागत गीत सादरीकरणाने महाशिबिराला प्रारंभ झाला. यावेळी असंघटीत क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम कार्डाचे वितरण कृषि मंत्री रवी नाईक व क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते वितरण करण्यात आले. यावेळी लाभार्थी सरकारी खात्यातील योजना व प्रलंबित असलेली लाभार्थीची कामे तात्काळ दालनाला भेट देत समस्येचे निवारण करण्यात आले. सरकारी योजनासह कामगारांच्या आरोग्य तपासणी मोफत सोय करण्यात आली होती. डोळे तपासणीसह सुमारे 50 जणांना मोफत चष्म्याचे वितरण करण्यात आले. महिलांना कर्करोगाविषयी निदान युवराज सिंग फाऊंडेशनच्या सहकार्याने येथे सोय करण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमात लोकनृत्य, लोकगीताच्या सादरीकरणाने महाशिबिराची सांगता झाली. सुमारे 500 हून अधिक लाभार्थीनी या महाशिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऍड. अक्षता भट यांनी केले.