गोमंतक मराठी अकादमीच्या आमसभेत ठराव : सरकारी प्राथमिक शाळांचे विलीनीकरण करु नये,भवनाचे उर्वरीत काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा
प्रतिनिधी /पेडणे
गोवा सरकारने गोमंतक मराठी अकादमीचे बंद केलेले अनुदान परत सुरु करुन ज्या प्रमाणे गोवा सरकार कोकणी भाषांच्या इतर संस्थासाठी अनुदान देते तशाच प्रकारे अनुदान गोमंतक मराठी अकादमीलाही द्यावे. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी प्राथमिक शाळा पटसंख्येचे कारण पुढे करुन विलीनीकरणाचा जो विचार पुढे आणलेला आहे तो विचार त्यांनी त्वरित रद्द करावा, असे ठराव गोमंतक मराठी अकादमीच्या पर्वरी येथे झालेल्या आमसभेत घेण्यात आले.
गोमंतक मराठी अकादमीची आमसभा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मराठी भवनाच्या पर्वरी येथील सभागृहात झाली. यावेळी विविध ठराव मांडण्यात आले. गोमंतक मराठी अकादमीचे कार्य गेली अनेक वर्ष सरकारच्या निर्णयाने आणि अनुदान बंद केल्याने बंद करण्यात आले ते अनुदान आता सरकारने सुरू करावे अशी मागणी या आमसभेत करण्यात आली. मराठी अकादमीचे भवन याची वास्तू आता रंगरंगोटी करुन साज चढवलेला आहे आणि या अनुषंगाने आता गोव्यात तसेच मराठी भवन सभागृहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचाही निर्णय यावेळी सभेत घेण्यात आला .
मराठी अकादमीवर 15 सदस्यांची निवड
गोमंतक मराठी अकादमीच्या रिक्त झालेल्या एकूण 15 जागांसाठी गट क्रमांक 1 मधून शिवानंद काका तळकर, सुदेश दिगंबर कोचरेकर, सुभाष उर्फ बुधू रामा महाले. गट क्र. 3 मधून उमेश लक्ष्मण परवार, नारायण बाळकृष्ण धारगळकर, निलेश नामदेव बुगडे, महादेव विष्णू गवंडी, विठ्ठल लाडू गावस. गट क्र. 4 मधून राजेश तुळशीदास कळंगुटकर, विश्वास राया नाईक. गट क्र. 5 मधून गुरुदास सावळ. गट क्र. 6 मधून दयानंद हरिचंद्र घाटवळ, पराग रंगनाथ वेळुस्कर. गट क्र. 7 मधून जीवन पांडुरंग केरकर. गट क्र. 10 मधून भाऊ जया नाईक या एकूण 15 सदस्यांची रिक्त असलेल्या जागेवर निवड झाली.
सभेत मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्यात आले. वर्षाचा तक्ता नफा तोटा पत्र ताळेबंद हिशेब तपासणीच्या शेरासह संमत करण्यात आला. हिशेब तपासणीची नेमणूक यावेळी करण्यात आली.
मराठी भवनात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संपर्क साधा
अध्यक्षांच्या परवानगीने यावेळी विविध ठराव आणि सूचना करण्यात आल्या. मराठी भाषा, मराठी संस्कृती याचा संवर्धन सर्वतोपरी करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन मराठी भवन सभागृहात तसेच गोव्याच्या विविध भागात करावे, अशी सूचना यावेळी सदस्यांनी केली. अभिजात मराठी संगीत नाटय़स्पर्धा गोमंतक मराठी अकादमी घेत होती ती परत सुरू करावी. गोमंतकातील कानाकोपऱयातील कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी ही मोठी स्पर्धा अकादमीने यापूर्वी आयोजित केली होती ती परत नव्याने सुरू करावी, अशी सूचना विठ्ठल गावस यांनी केली. नवोदित साहित्यिक, कवी यांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या मराठी पुस्तकांचे प्रकाशन करावे तसेच साहित्यिक, कलाकारांना मराठी कार्यक्रमाचे आयोजन मराठी भावनात करायचे असल्यास त्यांनी अकादमीकडे संपर्क साधण्याचाही निर्णय घेण्यात आला.
भवनाच्या उर्वरित कामासाठी सहकार्य करा : प्रदीप घाडी आमोणकर
यावेळी मराठी भवनाला रंगरंगोटी तसेच जे बांधकाम केले त्यासाठी अध्यक्ष प्रदीप घाडी अमोणकर तसेच कार्यकारी मंडळाचे अभिनंदन करण्यात आले. आमसभा सदस्य तसेच कार्यकारणी सदस्य यांनी मराठी भवनाचे उर्वरीत काम पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष प्रदिप घाडी आमोणकर यांनी केले. यापुढे सदस्यांनी पुढाकार घेऊन जे राहिलेले काम आहे ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजूटीने हे काम आणि मराठी भाषेच्या अभिवृद्धी साठी झटावे असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
स्वागत आणि प्रस्ताविक अध्यक्ष प्रदीप घाडी यांनी केले. चिटणीस भरत बागकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले ते सर्वानुमते संमत करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर, सदस्य विठ्ठल गावस, संजय हरमलकर, उदय ताम्हणकर, नारायण धारगळकर, निवृत्ती शिरोडकर, महादेव गवंडी, अमृत आगारवाडेकर, प्रभाकर ढगे, प्रकाश धुमाळ आदींनी भाग घेत विविध सूचना केल्या.
या सभेला मोठय़ा संख्येने सभासद उपस्थित होते. उपाध्यक्ष नरेंद्र आजगांवकर यांनी आभार मानले.