Tarun Bharat

मराठीचे अस्तित्व नष्ट करण्याचा शासनाचा प्रयत्न

Advertisements

ग्रामीण भागातील अंगणवाडय़ांमध्ये कानडीकरणाचा वरवंटा : किणये अंगणवाडीतील सर्व फलक कन्नडमध्येच : मराठी भाषिकांवर जाणीवपूर्वक अन्याय

वार्ताहर /किणये

सीमाभागातून मराठी भाषेचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मराठी भाषेतून परिपत्रके देण्यात यावीत यासाठी गेल्या चार-पाच महिन्यांपासून मोर्चा-आंदोलने करण्यात येत आहेत. दि. 8 रोजी मराठी परिपत्रकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर म. ए. समितीच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मराठी भाषिकांची आक्रमक भूमिका प्रशासनाची झोप उडवत असून आता कर्नाटक सरकारकडून ग्रामीण भागातील अंगणवाडी शाळांमध्ये कानडीकरणाची सक्ती करण्यात येत आहे. किणये येथील अंगणवाडीतील सर्व फलक केवळ कन्नडमध्येच लावल्यामुळे मराठी भाषिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

किणये गाव हे 100 टक्के मराठी बहुभाषिक आहे. या गावात अंगणवाडी, प्राथमिक शाळा व हायस्कूल हे मराठी माध्यमातूनच आहेत. असे असताना अंगणवाडीत फक्त कन्नड भाषेचा वापर केल्यामुळे या गावातील बालकांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार नेहमीच अन्याय करत आलेले आहे. बेळगावचे नामांतर, सीमाभागातील सरकारी कार्यालये, विविध संस्था यावरील फलक कन्नडमध्ये असले पाहिजेत अशी सक्ती करण्यात आली आहे. तसेच परिवहन मंडळाच्या बसवरील गावांच्या नावाचे बोर्ड कानडीमध्ये केले आहेत.

एवढे कुटिल कारस्थान करूनही सरकार काही शांत झालेले नाही. आता तर या सरकारने हद्दच पार केली आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या बालकांच्या अभ्यासक्रमावरच निशाणा साधला आहे. घरात, गावात मराठी बोलणाऱया भोळय़ा-भाबडय़ा बालकांवरही कन्नडसक्ती लागू करण्यात येत आहे. यामुळे बलकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होणार आहे. किणये प्राथमिक मराठी शाळेच्या बाजूला अंगणवाडीची इमारत होती. ती इमारत जीर्ण झाल्यामुळे त्याच ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात आली. या इमारतीचा मुख्य फलक कन्नडमध्येच लावला आहे. तसेच अंगणवाडीच्या भिंतींवर कन्नड अक्षरांमध्ये मुळाक्षरे, बाराखडी लिहिण्यात आली आहे.. यामुळे पालकवर्गातून नाराजी व्यक्त होत असून मराठी भाषेवर इतका तिरस्कार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

गेल्या 65 वर्षांपासून सीमाबांधव मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकविण्यासाठी संघर्ष करतो आहे. लोकशाही मार्गाने न्याय मागतो आहे. मात्र इथे सीमाबांधवांची गळचेपी करण्यात येत आहे. मराठी भाषेबद्दल कर्नाटक सरकारला पोटशूळ झालेली आहे. आपल्या हक्काच्या मातृभाषेसाठी सनदशिर मार्गाने सीमाबांधव न्याय मागत आहेत. सीमावासियांना विविध माध्यमातून त्रास देण्याचा डाव सरकारकडून रचण्यात येत असून अंगणवाडीत कन्नडसक्ती लागू करणे हा त्याचाच एक भाग आहे.

मराठी भाषेतून परिपत्रके द्या. अशी मागणी सध्या बेळगाव शहर व तालुक्यातून करण्यात येत आहे. दि. 8 रोजीच्या ठिय्या आंदोलनासंदर्भात गावागावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून कन्नडसक्ती करण्याची बळजबरी चालू करण्यात आली आहे.

कंत्राटदाराकडून उडवाउडवीची उत्तरे

किणये येथील रंगकाम करणाऱया कंत्राटदाराला फोन करून काहींनी जाब विचारला. मात्र यावेळी सदर कंत्राटदाराकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळाली, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

ग्रामस्थांची बैठक घेऊन तीव्र आंदोलन छेडणार…

किणये येथील अंगणवाडी शाळेतील मुख्य फलक व वर्गखोल्यांमध्ये रंगरंगोटी करून कन्नडमध्ये मुळाक्षरे लिहिण्यात आली आहेत. हा आमच्या गावावर केलेला अन्याय आहे. आमचे गाव 100 टक्के मराठी भाषिकांचे आहे. मातृभाषा मराठी आहे. मग येथील बालकांवर कन्नडसक्ती का? या प्रकारामुळे संपूर्ण गावातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आम्ही याचा निषेध करत आहोत. या संदर्भात ग्रामस्थांची बैठक घेऊन तीव्र आंदोलन करणार आहोत.

– अनिल पाटील, किणये

Related Stories

ओला दुष्काळ जाहीर करा; योग्य नुकसानभरपाई द्या

Amit Kulkarni

एन. डी. जोशी यांचे निधन

Amit Kulkarni

बुधवारी जिल्हय़ात 116 जण कोरोना पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

वादळी वाऱयाने नंदगाव शाळेचे उडाले पत्रे

Patil_p

राज्योत्सव साध्या पद्धतीने

Patil_p

शैक्षणिक संस्थांची घरपट्टी कमी करा

Patil_p
error: Content is protected !!