ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरु असताना आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना उपचारांसाठी रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपालांची काल केलेली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार केले जाणार आहे. अशातच गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई (Sreedharan Pillai) यांच्याकडे महाराष्ट्राचा कारभार काही दिवसांसाठी दिला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या या घडामोडींचा विचार करून केंद्राने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) ४० आमदार माझ्यासोबत असल्याचा दावा केल्याने ते स्वतंत्र्य गट स्थापन करण्याची शक्यता आहे. स्वतंत्र गटाच्या अधिकृत मान्यतेसाठी शिंदे आज दुपारी मुंबईत दाखल होत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याची माहिती होती. मात्र राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने शिंदेंना स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी आता आणखी प्रतिक्षा करावी लागणार असे बोलले जात आहे.
हेही वाचा : आमदार योगेश कदम गुवाहाटीला रवाना
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासाठी गुवाहाटीवरून एका विशेष विमानाची सोय करण्यात आली होती. मात्र आता राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याने मुंबईत आल्यानंतर शिंदे नेमकं कोणतं पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी शिंदेंना राज्यपाल कोरोनातून बरं होण्याची वाट पाहवी लागणार आहे. परंतु गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्याकडे काही काळासाठी हा कार्यभार दिला जाणार असल्याने एकनाथ शिंदे हे दुपारी गोव्याला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.