डॉ. शेखर साळकर यांच्यासमवेत चर्चा
प्रतिनिधी /पणजी
पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील बर्जर बेकर कोटिंग्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला लागलेल्या आगीची घटना ही राज्यासाठी चिंताजनक ठरली आहे. या आगीच्या घटनेबाबत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनीही गंभीरता व्यक्त करीत इंडियन मेडिकल असोसिएशन, गोवा विभागाचे माजी अध्यक्ष शेखर साळकर यांच्याशी चर्चा आज केली.
डॉ. साळकर हे अन्य एका कार्यक्रमासाठी राज्यपालांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यासाठी गेले असता राज्यपाल पिल्लई यांनी आगीच्या घटनेबाबत दीर्घ चर्चा केली. राज्यपाल पिल्लई यांनी पोलिस, अग्निशमन दल, प्रदूषण नियंत्रम मंडळ व आरोग्य खात्याचेही कौतुक करताना इंडियन मेडिकल असोसिएशननेही मदतीसाठी पुढे यायला हवे असे डॉ. साळकर यांना सांगितले. त्यावर डॉ. साळकर म्हणाले, इंडियन मेडिकल असोसिएशनने कोविड काळातही भरीव योगदान दिले असून, पिळर्ण येथील लोकांना मदत करण्यासाठी आम्ही केव्हाही तयार आहे. ज्या लोकांना आरोग्य सुरक्षेच्यादृष्टीने अन्यत्र हलविण्यात आले आहे, त्या सर्वांची तपासणी करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, राज्यपाल पिल्लई यांनी पिळर्ण येथील घटनेबाबत परिस्थितीचा आढावा घेतला असून, हे संकट लवकरच संपो आणि पिळर्णतील जनता या आघातातून खुल्या मनाने बाहेर पडो, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.