ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अजित पवार गटाच्या सरकारमधील एन्ट्रीमुळे जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटण्याचे नाव घेत नाही. अशातच स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण जिल्हा मुख्यालयात कोण करणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर शासनाने तोडगा काढला. जिल्हानिहाय ध्वजारोहणाची यादी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव जाहीर झाले होते. पण शासनाने या यादीत बदल केला. पुण्यात राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार असून चंद्रकांत पाटील रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत.
पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी अजित पवार इच्छुक आहेत. परंतु हा जिल्हा भाजपला हवा आहे. रायगडमध्येही तोच वाद आहे. तिथे शिवसेना आमदार भरत गोगावले पालकमंत्रीपदासाठी दावा करत आहेत. हा वाद टाळण्यासाठी रायगडला जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार होते. तर पुणे शहरात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार होते. पण ही यादी पुन्हा बदलण्यात आली.
जुन्या यादीनुसार पुण्यात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार होते. आता नवीन यादीनुसार ते रायगडमध्ये ध्वजारोहण करतील. पुण्यात राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार आहेत. यामुळे पुण्यात ना चंद्रकांत पाटील, ना अजित पवार असा तोडगा काढण्यात आला.