शिवाजी कृष्णमूर्ती अडचणीत
वृत्तसंस्था /चेन्नई
तामिळनाडूत सध्या राज्यपाल रवि विरुद्ध स्टॅलिन सरकार असा संघर्ष सुरू आहे. या संघर्षातून दररोज नवनवा वाद समोर येतत आहे. याचदरम्यान राज्यपाल आर.एन. रवि यांनी द्रमुकमधून निलंबित नेते शिवाजी कृष्णमूर्ती यांच्या विरोधात चेन्नईतील एका न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
कृष्णमूर्ती यांनी राज्यपालांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याप्रकरणी द्रमुक प्रमुख स्टॅलिन यांनी कृष्णमूर्ती यांना पक्षातून निलंबित केले होते. तर भाजप नेत्यांकडून कृष्णमूर्ती यांच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली होती.
तामिळनाडूत एम.के. स्टॅलिन सरकार आणि राज्यपाल रवि यांच्यात संघर्षाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णमूर्ती यांनी राज्यपाल रवि हे अभिभाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करण्यास नकार देत असतील तर त्यांच्यावर हल्ला करण्याचा मला अधिकार नाही का असे म्हटले होते. सरकारकडून दिलेले भाषण वाचायचे नसल्यास रवि यांनी काश्मीरमध्ये जावे, आम्ही त्यांना ठार करण्यासाठी दहशतवादी पाठवू असे आक्षेपार्ह विधान कृष्णमूर्ती यांनी केले होते.