मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे उद्गार : कोकणी भवनासाठी प्रयत्न करणार, कोकणी भाषा मंडळाचा 60 वा वर्धापनदिन सोहळा
प्रतिनिधी /फातोर्डा
कोकणी भाषा मंडळाला वेगवेगळ्या तालुक्यांत कोकणी माध्यमातील शाळा काढायची इच्छा आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाप्रमाणे मातृभाषेतून शिक्षण घेणे गरजेचे आहे आणि यासाठी आम्ही प्रयत्न करायला हवेत. नुकतीच मला पालक, शिक्षक व वेगवेगळ्या संस्थांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. सध्या सरकारी प्राथमिक शिक्षक कमी झाले आहेत, त्यांची भरती लगेच करण्यात येणार आहे व प्रथमिक शाळांना ज्या साधनसुविधा लागतील त्यांची गरज पूर्ण करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगाव रवींद्र भवनाच्या पाय तियात्रिस्ट सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगितले.
कोकणी भाषा मंडळातर्फे यावेळी 60 वा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्या मान्यताप्राप्त भाषा आहेत त्यांना सरकारकडून सहकार्य मिळेल. मराठी अकादमी असो वा कोकणी अकादमी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकार कटिबद्ध असेल. सध्या कोकणी अकादमीचे कार्यालय लहानशा जागेत आहे याची मला जाणीव आहे. कोकणी भाषेला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि कोकणी अकादमीचे भवन उभारण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी पुढे बोलताना दिले.
यावेळी व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे म्हणून मुंबई येथील टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसच्या स्कूल ऑफ डेव्हलपमेंट स्टडीजचे डीन डॉ. अश्विनी कुमार, कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्षा अन्वेषा सिंगबाळ, उपाध्यक्ष पोब्र फर्नांडिस, सचिव उल्हास गावकर, खजिनदार राजेश प्रभू उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ सावंत यांनी सांगितले की, भाषेचे कार्य करण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळणे कमी होणार नाही. कोकणी भाषा, कोकणी संस्कृती, कोकणी अस्मिता ही फक्त गोव्यापुरती मर्यादित न राहता ती गोव्याबाहेरील राज्यांत पोहोचावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी अश्विनी कुमार यांनी आपले विचार मांडताना कोकणी भाषेबद्दल व कोकणीच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. या सोहळय़ात गोवा व कोकणीसाठी निःस्वार्थीपणे कार्य केल्याबद्दल नागेश करमली, ऍड. उदय भेब्रे, दामोदर मावजो, पुंडलिक नाईक, मीना काकोडकर, हेमा नाईक यांना पाहुण्यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर लॉर्ना कार्देरो, अजित कडकडे, राजेंद्र आर्लेकर, अवधुत तिंबले, दत्तराज साळगावकर, श्रीनिवास धेंपे, डॉ. प्रमोद साळगावकर, कमलाक्ष नायक यांना मान्यवरांच्या हस्ते मानद् सदस्यत्व देण्यात आले. अन्वेषा सिंगबाळ यांनी स्वागत केले. याप्रसगी रवींद्र केळेकर ज्ञानमंदिराच्या विद्यार्थ्यांनी ‘कोकणीची मोठी कर्तृत्वाची साठी’ हा नृत्य, नाटय़, संगीताचा आविष्कार सादर केला तसेच ‘कोकणी’ या अंकाचा प्रकाशन सोहळा झाला.