प्रचंड उसळणाऱया लाटांचा जोरदार तडाखा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
सध्या अतिमुसळधार सर्वत्र सुरू आहे. परिणामी समुद्रालाही मोठे उधाण आले असून रोरावत येणाऱया प्रचंड लाटांचा येथील किनारपट्टीवर जोरदार तडाखा बसू लागला आहे. बुधवारी 13 जुलै रोजी पौणिमेच्या दिवशी तर या लाटांचे येथील किनारपट्टीवर जणू थैमान पहायला मिळाले. येथील मिऱया बंधारा ओलांडून उंचच उंच लाटा जात होत्या. अजूनही जुलै महिन्यात 6 वेळा, ऑगस्ट महिन्यात 7 वेळा व सप्टेंबर महिन्यात 6 वेळा मोठे उधाण येणार असल्याचे सांगण्यात आले.
पावसाळ्य़ात समुद्राला उधाण आल्याने लाटांचा वेग कमालीचा वाढला आहे. दरम्यान या कालावधीत येणाऱया मोठय़ा भरतीवेळी उधाणाचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. या हंगामातही समुद्रात 26 वेळा उधाण (मोठी भरती) देण्यात आले होते. त्यामुळे प्रशासन स्तरावरून किनारपट्टीवर राहणाऱया नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रादेशिक बंदर विभागाकडून यापूर्वीच देण्यात आला आहे.
समुद्राला येणाऱया उधाणाचा येथील किनारपट्टीवरील रहिवाशांना फटका बसत असतो. या उधाणावेळी जर मोठय़ा प्रमाणावर पाऊस सुरू असेल तर समुद्रकिनाऱयासोबतच खाडीकिनाऱयावरील वस्त्यांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी या काळात दक्ष राहून होणाऱया जीवित व वित्तहानीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. बंदर विभागामार्फत या काळात बंदरात धोक्याची सूचना म्हणून बंदरातून बावटा लावण्यात आला आहे. तसेच या काळात मच्छीमार तसेच नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, असाही इशारा देण्यात आला आहे. .
आगामी काळातील समुद्राला येणाऱया भरतीचे दिवस ः
@जुलै महिन्यामध्ये बुधवार 13 ते रविवार 17 जुलै या कालावधीत मोठी भरती येणार आहे. या काळात समुद्रात 4 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तसेच 30 व 31 जुलै हे दिवसही मोठय़ा भरतीचे असणार आहेत.
@ऑगस्ट महिन्यामध्ये गुरुवारी 11 ते सोमवार 15 ऑगस्ट या काळात भरती येणार आहे. या कालावधीत 2 ते सव्वा दोन मीटर उंचीच्या लाटा उसळतील. 29 व 30 ऑगस्ट या दिवशीही मोठी भरती असणार आहे.
@सप्टेंबर महिन्यात शुक्रवार 9 ते 13 सप्टेंबर हे मोठय़ा उधाणाचे दिवस असून या काळात 2 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत.