कृष्णात चौगले, कोल्हापूर
Gram Panchayat Election 2022 : जिह्यातील 474 ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवारी अर्ज माघार घेतल्यामुळे लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.त्यामुळे जाहीर प्रचाराला वेग आला असून निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी एक-एक मत मिळवण्यासाठी ताकद पणाला लावली आहे.ही निवडणूक पक्षीय पातळी बरोबरच गावातील गटातटांमध्ये होत असल्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे.गावची सत्ता पुन्हा आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी मंडळी केलेल्या विकासकामांचे मार्केटिंग करत आहेत.तर विरोधी आघाड्यांकडून सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कारभारावर बोट ठेवून आपल्याच आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करत आहेतत्यामुळे गावच्या सत्तेसाठी काय पण !असेच चित्र जिह्यातील ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीतून स्पष्ट होत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे राजकीय वाटचालीमधील पहिली पायरी.ही पायरी यशस्वीरित्या सर करण्यासाठी अनेक इच्छुक सरसावले आहेत.सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होत असल्यामुळे प्रत्येक गावात चुरस वाढली आहे.मतदानाचा दिवस जसा जवळ येईल तसे गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. 18 डिसेंबरला मतदान होणार असून 16 रोजी रात्री जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रचारासाठी केवळ आठ दिवस उरले आहेत.सध्या उमेदवारांकडून वैयक्तिक भेटीगाठीवर अधिक भर दिला जात आहे. यापूर्वी गावामध्ये दोन किंवा तीन राजकीय गट असायचे. पण सध्या सोईस्कर अशा स्थानिक आघाडय़ा तयार झाल्या आहेत.त्यामुळे पक्षीय राजकारणाला काही अंशी छेद गेला आहे.
निवडणूक कोणतीही असो.जेवणावळी आणि अर्थपूर्ण घडामोडी असे एक समीकरणच बनले आहे.हे समीकरण ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने अधिक बळकट झाले आहे.गावागावात मते मॅनेज करणाऱ्या एका प्रवृत्तीचे महत्व आणि मान वाढला आहे.कोणाला काय द्यायचे,याचा त्यांना अंदाज आहे.मंडळाच्या कार्यकर्त्यांना खूष केले जात आहे.
हेही वाचा- गडहिंग्लज तालुक्यातील 30 गावांत प्रचाराचा धुरळा,चार गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध
काही धनदांडगे गटनेते आणि उमेदवारांकडून मतदारराजाला अनेक तात्पुरती प्रलोभने दाखवली जात आहेत. ‘आपण म्हणेल त्याच्याकडे गावची सत्ता’ अशा पद्धतीने त्यांची वाटचाल सुरु आहे. काही उमेदवारांनी तर मतदानापूर्वी अर्थपूर्ण घडामोडी करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी तात्पुरत्या प्रलोभनाला बळी पडण्याऐवजी त्या उमेदवाराने यापूर्वी गावासाठी काय योगदान दिले आहे ? आणि पुढील पाच वर्षासाठी त्यांचा वचननामा काय आहे ? हे पाहून मतदान देणे अपेक्षित आहे.
पारंपरिक उमेदवारांविरोधात युवकांचे बंड
शासनाकडून 15 व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना दिला जातो. हा निधी सरपंचाच्या सहीने खर्च होतो. या निधीसह ग्रामपंचायतीमधील इतर महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार सरपंचला बहाल करण्यात आले आहेत. परिणामी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्यपद नको, ग्रामपंचायतीची सत्ता हवी, अशी लोकांची मानसिकता बनली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये साम, दाम, दंड ही राजकीय निती वापरली जात आहे. काही गावांत अनेक वर्षे सत्ता उपभोगूनही तीच मंडळी पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे सत्ताधारी मंडळीविरोधात गावातील युवकांनी बंड केले असून ‘धनशक्ती विरूद्ध जनशक्ती’ अशा लढती होत आहेत. यामध्ये ग्रामस्थांकडून युवकांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
जिह्यातील 474 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असल्यामुळे सुमारे 50 टक्के गावांचा समावेश आहे. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसह विधानसभेची रंगीत तालीम ठरणार आहे. परिणामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून एक-एक गाव ताब्यात घेण्यासाठी त्या मतदार संघातील लोकप्रतिनिधींची ताकद पणाला लागणार आहे.


previous post
next post