अंतिम मतदारयादीनंतर त्वरित निवडणूक कार्यक्रम होणार जाहीर : 474 ग्रामपंचायतींमध्ये उडणार राजकीय धुरळा : ग्रा. पं. चा निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत प्रशासकराज : मुदत संपणाऱ्या ग्रा. पं. वर टप्प्याटप्प्याने प्रशासक नियुक्ती
प्रतिनिधी/कोल्हापूर
नोव्हेंबर ते डिसेंबर 2022 अखेर मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारयादी कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. त्यानुसार 31 मे 2022 अखेर अस्तित्वात असलेली मतदारयादी गृहित धरली जाणार असून 21 ऑक्टोबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर त्वरित सर्व ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे गावची सत्ता मिळवण्यासाठी ऐन दिवाळीत राजकीय रणधुमाळी पहावयास मिळणार आहे. दरम्यान, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन ग्रामपंचायतीची पहिली सभा होईपर्यंत ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी प्रशासकांची नियुक्ती केली जाणार आहे.
जिह्यात एकूण 1025 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 अखेर 475 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. यामध्ये ऑक्टोबरमध्ये मुदत संपलेल्या एका ग्रा. पं. ची निवडणूक झाली असून अद्याप नोव्हेंबरमधील 429 आणि डिसेंबरमध्ये कालावधी संपणाऱ्या 45 ग्रामपंचायतींची लवकरच निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. शासनाने प्रशासक नियुक्तीचा आदेश काढल्यामुळे निवडणुका लांबणीवर पडणार की काय, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
हे ही वाचा : फुटीच्या भीतीने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर
टप्प्याटप्प्याने होणार प्रशासकांची नियुक्ती
नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या 474 ग्रामपंचायतींवर टप्प्याटप्प्याने प्रशासकांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी, शिक्षण, ग्रामपंचायत, सामान्य प्रशासन, सांख्यिकी विभागातील विस्तार अधिकारी अथवा समकक्ष अधिकारी, शाखा अभियंता आदी अधिकाऱयांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. ग्रामसेवकांना प्रशासक पदावर नियुक्त केले जाणार नाही. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण प्रशासकांची नियुक्ती करणार आहेत.
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या
तालुका नोव्हेंबर डिसेंबर
करवीर 49 4
गडहिंग्लज 31 3
पन्हाळा 45 5
कागल 24 2
चंदगड 26 14
राधानगरी 56 10
गगनबावडा 20 1
शाहूवाडी 48 0
शिरोळ 16 1
भुदरगड 42 2
आजरा 36 0
हातकणंगले 36 3
एकूण 429 45