Tarun Bharat

स्मशानभूमीच्या जागेतच ग्राम पंचायत

ग्रामस्थांचा विरोध असतानाही काम सुरू : धामणे ग्राम पंचायत पीडीओ-अध्यक्षांच्या मनमानीमुळे संताप

वार्ताहर /धामणे

धामणे ग्राम पंचायतीची इमारत जीर्ण झाली होती. ती इमारत नव्याने बांधणे गरजेचे आहे. मात्र नव्याने बांधण्यात येणारी ग्राम पंचायत ही हिंदू समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेत उभारण्यात येत आहे. या जागेचा वाद न्यायालयात आहे. तसेच या ठिकाणी ग्राम पंचायतीची इमारत उभी करण्यास ग्रामस्थांनी पूर्ण विरोध केला असताना त्याठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे धामणे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ग्राम पंचायत पीडीओ आणि ग्राम पंचायत अध्यक्ष व काही ग्राम पंचायत सदस्य हा मनमानी कारभार करत आहेत. या जागेसाठी न्यायालयातून स्थगिती आणण्यात आली होती. मात्र कॅव्हेट घेवून ही इमारत बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्राम पंचायत पिडीओसह अध्यक्ष व सदस्यांना 17 मे 2022 रोजी न्यायालयात हजर रहावे, अशी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र यामधील कोणीही न्यायालयात हजर झाले नाहीत.

न्यायालयाचा अवमान करत उलट मंगळवार दि. 24 मे रोजी जेसीबीच्या सहाय्याने कॉलम उभारणी करण्यासाठी खड्डय़ांची खोदाई करण्यात आली आहे. यामुळे न्यायालयाचा अवमान करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, हे काम नरेगा अंतर्गत केल्याचे दाखविण्यात येत आहे. मात्र कामगारांऐवजी चक्क जेसीबीच्या सहाय्याने त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ग्राम पंचायत अध्यक्ष आणि पीडीओंना हा अधिकार कोणी दिला आहे? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

हिंदू स्मशानभूमी सर्व्हे क्रमांक 515 मधील जागेमध्ये ही इमारत उभी करण्यात येत आहे. त्या ठिकाणी इमारत बांधली तर अंत्यविधी करायचे कुठे? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. ग्रामस्थांनी ग्राम पंचायतीच्या इमारतीला विरोध केला नाही तर मात्र जुनी इमारत आहे त्याठिकाणीच नव्याने इमारत उभी करावी, अशीच मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये इमारत बांधण्याचा अट्टाहास कशासाठी केला जात आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

सुळगा (हिं) सिमेदेव मैदानाची पीडिओंनी तातडीने केली पाहणी

Patil_p

प्लास्टिकविरोधी कारवाई काटेकोर करा

Omkar B

खानापुरा तालुक्याला पुरेशी बससेवा उपलब्ध करून देणे

mithun mane

साईराज वॉरियर्स, दैवज्ञ स्पोर्टस् क्लब विजयी

Patil_p

म. ए. समिती महिला आघाडीची आयसोलेशन सेंटरसाठी मोफत सेवा

Amit Kulkarni

यंदाच्या गणेशोत्सवाला कडक नियमांचे मखर

Tousif Mujawar