खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा : दुरुस्तीची मागणी
वार्ताहर /सांबरा
महादेवनगर सांबरा येथील मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली असून रस्त्याच्या दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांच्या गैरसोयीत दिवसेंदिवस भर पडत आहे.
येथील एअरपोर्ट क्रॉसजवळ महादेवनगर वसाहत आहे. या ठिकाणी माजी सैनिक व वायुदलातील सैनिकांचा मोठय़ा संख्येने वावर असतो. याच परिसरातून ग्रामपंचायतीला सर्वाधिक करही मिळतो. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे.
याबाबत येथील नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीला निवेदन देऊनही ग्रामपंचायतीकडून रस्ता दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
यामुळे नागरिकांनी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करून रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी केली होती. पत्राची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाकडून संबंधित अधिकाऱयांना रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, रस्ता करण्याकडे संबंधितांकडून पूर्ण दुर्लक्ष होत आहे. यासाठी येथील नागरिकांनी पुन्हा पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्याचे ठरविले आहे.