शिराळा/वार्ताहर
Grampanchyat Election 2022 : शिराळा तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीसाठी १३०२ कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत .सकाळी तहसील कार्यालयात मतदानासाठी लागणारे साहित्य नेण्यासाठी केंद्राध्यक्ष व कर्मचारी उपस्थित होते होते.तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून मतदानासाठी एकूण १३०२ कर्मचारी आज मतदान केंद्रावर २५ एसटी बस व ७ जीप मधून रवाना झाले.तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीसाठी १९५ मतदान केंद्रे असून यासाठी १४ झोनल अधिकारी,तर २७ निवडणुक निर्णय अधिकारी,२१७ केंद्राध्यक्ष असे एकूण १३०२ मतदान अधिकारी व कर्मचारी आहेत. मतदानाची वेळ रविवार दिनांक १८ रोजी सकाळी ७.३० ते ५.३० अशी आहे.
तालुक्यातील कांदे,सांगावं,कणदूर,पाडळी,मांगले,आरळा,कोकरुड,शेडगेवाडी,चिंचोली,मणदूर,मांगरुळ,येळापूर,चरण ही गावे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.त्याठिकाणी विषेश पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तर शिराळा शहरातील वाहतूक मार्गात दोन दिवसांसाठी बदल करण्यात आला आहे.आयटीआय बायपास ते करमाळा रोड पर्यंतचा हा प्रमुख मार्ग वाहतूकीसाठी बंद राहणार असून रविवारी दिनांक १८ रोजी रात्री उशिरा पर्यंत बंद राहणार आहे.यावेळी हि वाहतूक कापरी नाका ते बायपास अशी सुरू राहणार आहे.
यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला असून यामध्ये १ पोलिस उपअधिक्षक,१ पोलिस निरीक्षक,७ पोलिस उपनिरीक्षक,१९७ पोलिस कर्मचारी,९१ होमगार्ड,१ एसआरपी एफ सेक्शन सह ८ वाहने ठेवण्यात आली आहेत.तसेच भरारी पोलिस पथके ही ठेवण्यात आली आहेत.